लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरातील नागरिकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी सर्वच लसीकरण केंद्रांवर गर्दी केली होती. लस मिळविण्यासाठी पहाटेपासूनच केंद्रांवर नागरिक रांगेत उभे होते. त्यामुळे काहीकाळ गोंधळ उडाला होता. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांचे ८४ दिवस पूर्ण झाल्याने त्यांनी केंद्रांवर दुसरा डोस घेण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला.
कोरोना महामारीवर प्रभावी उपाययोजना म्हणून सरकारने लसीकरणास सुरुवात केली आहे. इचलकरंजी शहरात सध्या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरण सुरू असून, नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रथम नागरिकांच्या मनातील शंका व भीतीपोटी लसीकरणास अल्प प्रतिसाद मिळत होता. मात्र, कोरोनाची दुसरी लाट व जागरूकतेमुळे लस घेण्यासाठी नागरिक पुढे सरसावले. केंद्रांवर प्राधान्याने ६० वर्षांपुढील व ४५ ते ५९ वयोगटातील व्याधीग्रस्त नागरिकांचे लसीकरण सुरू होते. बुधवारी दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्याने लस दिली जात असल्याने नागरिकांची झुंबड उडाली.
लसीकरण केंद्रांवर लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. यात पॉझिटीिव्ह येणाऱ्या नागरिकांना विलगीकरण केले जात आहे. या वेळी वयोवृद्ध नागरिकांची संख्या मोठी होती. काही केंद्रांवर बसण्यासाठी व सावलीची कोणतीही सोय नसल्याने त्यांचे हाल झाले. केंद्रांवरील कर्मचारी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांना सूचना देत होते. परंतु नागरिकांची संख्या अधिक असल्याने यामध्ये अडचणी येत होत्या.
चौकट
कोव्हॅक्सिनला अल्प प्रतिसाद
सरकारने कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन प्रकारच्या लसींना परवानगी दिली असल्याने शहरात त्याचे लसीकरण सुरू आहे. परंतु कोविशिल्डच्या प्रमाणात कोव्हॅक्सिनला मागणी कमी असल्याचे चित्र आहे. नागरिकही कोविशिल्ड लसीकरणासाठी आग्रह धरत आहेत. त्यामुळे कोव्हॅक्सिनचे डोस शिल्लक राहत आहेत.
फोटो ओळी
०७०७२०२१-आयसीएच-०१
इचलकरंजीत दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्याने सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता.
०७०७२०२१-आयसीएच-०२
केंद्रांवर लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.
सर्व छाया-उत्तम पाटील