रूकडी माणगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हा जमावबंदी असताना, साजणी (ता. हातकणंगले) येथील नागरिकांना जमावबंदी आदेश माहितीच नसल्याचा प्रकार दिसत असून, चौका-चौकात दहा, वीस नागरिक व प्रमुख मार्गावर नागरिक गटागटाने विनामास्क खुलेआम फिरत गावास वेठीस धरत आहेत.
एकीकडे कोरोना संसर्गित आजार हाहाकार माजवत असताना गावात विनामास्क आणि भर चौकात खुलेआम नागरिक बसून कोरोनाची प्रतीक्षा करत आहेत का? अशी परिस्थिती आहे. साजणी येथे कोरोनाने पाच लोक मृत झाले असतानाही नागरिक पुरेसे काळजी घेत नसल्याने ग्रामपंचायत सदस्य व आपत्ती व्यवस्थापन समिती हतबल झाल्याची परिस्थिती आहे.
गावामध्ये कोरोनाची लागण झाल्यानंतर ग्रामपंचायत व दक्षता समिती यांनी वेळोवेळी दवंडी देऊन नागरिकांनी पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहन करूनही नागरिक पुरेशी काळजी न घेता खुलेआम एकत्रित चौका-चौकात बसत आहेत.
मध्यंतरी येथील भाजी विक्रेते मास्क न वापरता व सुरक्षित अंतर न ठेवता बाजार भरविल्याने येथे ४८ रूग्ण कोरानाने बाधित झाले असताना, अदयापही नागरिक गर्दी करण्याचे टाळत नसल्याचे चित्र आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत समिती व आपत्ती व्यवस्थापन समिती यांनी दि. १७ पासून गावात येणारे प्रमुख मार्ग बंद केले असून, गावांतील बाहेर व बाहेरील नागरिक गावात येण्यास मज्जाव केला आहे.