कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनावर शहरातील लसीकरणाची जबाबदारी आहे. सुरुवातीला संथगतीने लसीकरण सुरू असल्याची बाब समोर आल्यानंतर हे लसीकरण वाढवा अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून पालिकेला प्राप्त झाल्या. तरीही लस टोचून घेण्याकडे कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. दरम्यान, मंगळवापासून ४५ ते ५९ वयोगटातील कोमॉर्बिड व्यक्तींना, तसेच ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लस देण्याचा निर्णय झाला.
बुधवारी दिवसभरात शहरातील सात नागरी आरोग्य केंद्रे व सीपीआर येथे १३१९ व्यक्तींनी लस टोचून घेतली. आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन बरोबरच ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन करण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक लस टोचून घेण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. एका दिवसांत ५५० ज्येष्ठ नागरिकांनी लस टोचून घेतली, तर ४५ ते ५९ वयोगटातील १३१ व्यक्तींना ही लस देण्यात आली. २८९ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतला, तर १९२ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला. महापालिकेच्या १५७ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. लस घेण्यासाठी होत असलेली गर्दी लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने आणखी तीन केंद्रे वाढविली आहेत.