पन्हाळा : निर्सगरम्य पन्हाळगडाची महती सर्वदूर आहे. येथील थंडगार वारा, दाट धुके, येथील प्रसिद्ध असलेली झुणका-भाकर यामुळे पन्हाळगडावर पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. शनिवारी आणि रविवारी वर्षा सहलीसाठी पन्हाळगड पर्यटकांनी हाऊसफुल्ल होत आहे.
सर्वसामान्य लोकांच्या खिशाला परवडणाऱ्या पन्हाळगडावर पर्यटकांची गर्दी येथील तीन दरवाजा, अंधारबाव, सज्जा कोठी, धान्याचे कोठार, पुसाटी बुरुज परिसर, तबक उद्यान, लता मंगेशकर बंगला परिसर, आकाशवाणी टाॅवर परिसर, पावनगड, रेडेघाट येथे पर्यटकांचे जथ्थेच्या जथ्थे पाहण्यास मिळत आहेत. पर्यटकांच्या गर्दीमुळे लहान-मोठे व्यवसाय तेजीत सुरू आहेत. पर्यटकांच्या गर्दीमुळे भाजलेले व उकडलेले कणीस, पाणीपुरी, भेळ, मिसळ, झुणका-भाकर या खाद्यपदार्थांवर पर्यटक ताव मारताना दिसत आहेत.
दरम्यान, पन्हाळा येथे पर्यटकांच्या गर्दीमुळे वाहतुकीचा व वाहन पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाहतुकीचे नियम मोडल्याने पोलिसांनी सुमारे चाळीस गुन्हे दाखल केले आहेत. उच्चांकी गर्दीमुळे नगर परिषदेकडे दीड लाख रुपये प्रवासी कर गोळा झाला आहे. सध्या वाहनांच्या व पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे वाहनांचे अस्ताव्यस्त पार्किंग होत असल्याने चालणेही अवघड झाले आहे. नगर परिषद कर्मचाऱ्यांनी याकडे लक्ष देणे अपेक्षित आहे.