कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त सोमवारी रात्री साडेनऊ वाजता परंपरेनुसार निघालेल्या सोन्याच्या पालखीची मिरवणूक पाहण्यासाठी अलोट गर्दी झाली होती. पालखीचे पूजन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रभारी सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण याची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, मिरवणुकीत प्रचंड संख्येने भाविक सहभागी झाल्याने काहीवेळ ढकला ढकलीचा प्रकार झाला.
सोन्याच्या पालखीला एक शिखर रूपात फुलांनी सजविण्यात आले होते. गरुड मंडपातून पालखीची मिरवणूक गणपती चौकात आली. तिथे दर्शनासाठी काहीवेळ पालखी ठेवण्यात आली. तेथून दत्त मंदिर, घाटी दरवाजा, शनी मंदिर, महाव्दार रोड मार्गे मिरवणुकीची सांगता गरुड मंडपात झाली. मिरवणुकीत पोलीस बॅन्ड वाजविण्यात आला. पालखी पाहण्यासाठी मंदिर परिसरात आबाल, वृध्दासह भाविकांची गर्दी उसळली.
पोलीस बॅन्डचा निदान आणि भाविकांची दर्शनासाठी झालेल्या गर्दीमुळे परिसरातील वातावरण काहीकाळ भक्तिमय बनले होते. कोरानामुळे दोन वर्षाच्या खंडानंतर निघालेलेली पालखी मिरवणूक पाहण्यासाठी अनेकांची पाऊले रात्री आठपासूनच मंदिराच्या दिशेने वळली होती. मंदिराच्या सर्व रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी वाहने पार्किंग करण्यात आली होती. परगावाहूनही अंबाबाईंच्या दर्शनासाठी आलेले अनेक भाविकही पालखी मिरवणुकीत सहभागी झाले होते.