इचलकरंजी : वाढत्या कोरोना महामारीला रोखण्यासाठी राज्य शासनाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. ‘ब्रेक द चेन’ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन अटोकाट प्रयत्न करत आहे. मात्र, शहर व परिसरात नागरिक नेहमीप्रमाणे बाजारात गर्दी करीत आहेत. जणू शहरातून सकाळी सात ते अकरा वाजता कोरोना गायब? होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. अशीच गर्दी राहिल्यास कोरोना कमी कसा होणार, असा सवाल नियमांचे पालन करणाऱ्या नागरिकांतून विचारला जात आहे.
शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. शहरातील हॉस्पिटल फुल्ल होत आहेत. बेड मिळविण्यासाठी नातेवाइकांची धावपळ उडत आहे तरीही काही नागरिक संसर्ग कोणतीच खबरदारी घेताना दिसत नाहीत. आपल्याला काही होणार नाही, या भावनेतून फिरताना दिसत आहेत. एकीकडे कोरोनाचे वाढते रुग्ण आणि त्यातच बाजारात होणारी गर्दी ही प्रशासनाची डोकेदुखी बनली आहे.
आगामी ईद व अक्षय्यतृतीया या सणांच्या पार्श्वभूमीवर नागरिक खरेदीसाठी गर्दी करू लागले आहेत. प्रशासनाकडून जनजागृती सुरू आहे. तसेच नियम मोडणाऱ्यांवर दंडाची कडक कारवाई केली जात आहे. परंतु नागरिकांनी प्रशासनाला वाटाण्याच्या अक्षता दाखवत बाजारात गर्दी सुरू ठेवली आहे. काहीजण प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत आहेत; परंतु बेफिकीर नागरिकांमुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती निर्माण होत आहे.
चौकटी
नियम डावलून अनेक आस्थापना सुरूच
प्रशासनाने ‘अत्यावश्यक सेवा’वगळता सकाळी सात ते अकरा इतर आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत तरीही शहरातील मुख्य मार्गासह अंतर्गत रस्त्यावरील अनेक आस्थापने सुरू होती. प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून बिनदिक्कतपणे सर्व व्यवहार सुरू होते.
अंमलबजावणी करणाऱ्यांमधून तीव्र नाराजी
अनेक नागरिक नियमांचे पालन करत आपले आस्थापना सुरू ठेवत आहेत तसेच बाजारातील व्यवहार पार पाडत आहेत; परंतु नियम मोडून वागणाऱ्यांमुळे योग्य अंमलबजावणी करणाऱ्या नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
फोटो ओळी
०७०५२०२१-आयसीएच-०१
इचलकरंजीत बिनदिक्कतपणे नागरिक नेहमीप्रमाणे बाजारात गर्दी करत आहेत.
छाया-उत्तम पाटील