इचलकरंजी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे बाजारपेठ सजावटीच्या साहित्यांनी सजली आहे. शहरातील मुख्य मार्गांसह विविध ठिकाणी सजावटीचे साहित्य व गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल उभारले आहेत. शहरात कोरोना संसर्गाचा प्रभाव काही प्रमाणात कमी आल्याने प्रशासनाने नियमांमध्ये शिथिलता दिली आहे. त्यामुळे नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडताना दिसत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लगबग वाढली आहे.
गणेशोत्सवामध्ये घरगुती सजावटीसाठी अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे आपली आरास इतरांपेक्षा कशी सरस ठरेल, यासाठी सर्वजण प्रयत्नशील असतात. त्यादृष्टीने खरेदी केली जात आहे. घरगुती गणेशमूर्ती व सजावटीच्या साहित्य स्टॉल काही दिवसांपूर्वीच सुरू झाले आहेत. गांधी पुतळा, मलाबादे चौक, लक्ष्मी मार्केट, सरस्वती मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, कलानगर, विक्रमनगर, डेक्कन चौक, आदी ठिकाणी श्री मूर्तींचे स्टॉल तसेच सजावटीच्या साहित्यांची दुकाने सजली असून खरेदीसाठी गर्दीने फुलून गेली आहेत.
रंगीबेरंगी तोरण, मोत्यांचे हार, फुलांच्या माळा, विविध प्रकारचे मखर, कापडी मंडप, पडदे, विविध नमुन्यातील लायटींगच्या माळा, झुंबर या वस्तूंची बाजारात मोठी रेलचेल दिसून येत आहे. गतवेळच्या तुलनेत यंदा सजावटीचे साहित्य व गणेशमूर्तीच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मंडप उभारणीचे काम गतीने सुरू आहे. मंडळाच्या गणेशमूर्तींचे काम अंतिम टप्प्यात असून, कुंभारवाड्यात घाई वाढली आहे. अनेकांचा पर्यावरणपूरक सण साजरा करण्याकडे कल दिसून येतो. त्यानुसार कागदी पुठ्ठे, बांबू, तसेच इतर पर्यावरणपूरक साहित्यापासून बनवलेले साहित्य खरेदी केले जात आहे. यावेळी बालगणेश, जास्वंदीच्या फुलातील, सिंहासनावरील, मोरावरील, लालबाग, दगडूशेठ यासह विविध रुपातील सहा इंचापासून दोन फुटांपर्यंत आकर्षक गणेशाची मोहक रुपे स्टॉलवर उपलब्ध आहेत. कोरोना महामारीमुळे प्रशासनाने घालून दिलेल्या अटी व नियमानुसार यंदाही गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे.
चौकट
नगरपालिकेचे फक्त आवाहनच
नगरपालिकेने शहरात ठराविक आठ ठिकाणी गणपती स्टॉल उभारण्यासाठी नियोजन केले होते. त्यानुसार विक्रेत्यांना आवाहन करण्यात आले होते. परंतु ते फक्त कागदोपत्रीच राहिले. प्रत्यक्षात दरवर्षीप्रमाणे सर्वत्र स्टॉल उभारण्यात आले आहेत.
फोटो ओळी
०७०९२०२१-आयसीएच-०३
०७०९२०२१-आयसीएच-०४
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सजावटीचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
छाया-उत्तम पाटील