कोल्हापूर : आठ दिवसांच्या कडक लॉकडाऊननंतर सोमवारी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला खरेदीसाठी गर्दी उसळली होती. समिती प्रशासनाने पास देऊन गर्दी नियंत्रीत करण्याचा प्रयत्न केला, तरीही खरेदीदारांची संख्या वाढल्याने यंत्रणेवर ताण आला.कोल्हापूरातील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आठ दिवसाचे कडक लॉकडाऊन केले होते. यामध्ये दूध व मेडीकल वगळता इतर कोणालाही मोकळीक दिली नव्हती. भाजीपाला विक्रीवही निर्बंध आणल्याने गेली आठ दिवस बाजार समितीतील सौदे पुर्णपणे बंद होते. सोमवार पासून लॉकडाऊन शिथील केल्याने भाजीपाला, फळे, कांदा-बटाट्याची विक्री सुरु झाली.
बाजार समितीमधील सौदेही सुरु करण्यात आले. भाजीपाल्याच्या सौद्यावेळी गर्दी होऊ नये, यासाठी समिती प्रशासनाने खरेदीदारांना पास दिले आहेत. पहाटे पाच पासून पास पाहूनच खरेदीदारांना समितीत प्रवेश दिला जात आहे. मुळात सौद्याची वेळ कमी असल्याने भाजीपाला खरेदीसाठी गर्दी होते. तरीही समितीने बॅरेकेट लावून सामाजिक अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.आठ दिवसानंतर सोमवारी भाजीपाला, फळे व कांदा - बटाट्याचे सौदे पुर्ववत झाल्याने खरेदीदारांनी गर्दी केली होती. आठ दिवस घरात भाजीपाला नसल्याने समितीमधून लवकर खरेदी करुन ग्राहकांपर्यंत जाण्यासाठी खरेदीदारांची गडबड सुरु होती.दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागाने सकाळी समिती आवारात खरेदीसाठी आलेल्यांची ॲन्टीजेन चाचणी घेतल्या. तब्बल २३० जणांची चाचणी करण्यात आली, त्यामध्ये पाच जण पॉझीटीव्ह सापडले.