लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : आठ दिवसांच्या कडक लॉकडाऊननंतर सोमवारी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला खरेदीसाठी गर्दी उसळली होती. समिती प्रशासनाने पास देऊन गर्दी नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, तरीही खरेदीदारांची संख्या वाढल्याने यंत्रणेवर ताण आला.
कोल्हापुरातील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आठ दिवसांचे कडक लॉकडाऊन केले होते. यामध्ये दूध व मेडिकल वगळता इतर कोणालाही मोकळीक दिली नव्हती. भाजीपाला विक्रीवरही निर्बंध आणल्याने गेले आठ दिवस बाजार समितीतील सौदे पूर्णपणे बंद होते. सोमवारपासून लॉकडाऊन शिथिल केल्याने भाजीपाला, फळे, कांदा-बटाट्याची विक्री सुरू झाली. बाजार समितीमधील सौदेही सुरू करण्यात आले. भाजीपाल्याच्या सौद्यावेळी गर्दी होऊ नये, यासाठी समिती प्रशासनाने खरेदीदारांना पास दिले आहेत. पहाटे पाचपासून पास पाहूनच खरेदीदारांना समितीत प्रवेश दिला जात आहे. मुळात सौद्याची वेळ कमी असल्याने भाजीपाला खरेदीसाठी गर्दी होते. तरीही समितीने बॅरिकेड लावून सामाजिक अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
आठ दिवसांनंतर सोमवारी भाजीपाला, फळे व कांदा-बटाट्याचे सौदे पूर्ववत झाल्याने खरेदीदारांनी गर्दी केली हाेती. आठ दिवस घरात भाजीपाला नसल्याने समितीमधून लवकर खरेदी करून ग्राहकांपर्यंत जाण्यासाठी खरेदीदारांची गडबड सुरू होती.
दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागाने सकाळी समिती आवारात खरेदीसाठी आलेल्यांची अँटिजन चाचणी घेतली. तब्बल २३० जणांची चाचणी करण्यात आली, त्यामध्ये पाचजण पॉझिटिव्ह सापडले.
आजपासून अधिक सतर्कता
समितीमध्ये होणारी गर्दी आणि अँटिजन चाचणीत सापडत असलेले कोरोना रुग्ण पाहता समिती प्रशासनाने आज, मंगळवारपासून यंत्रणा अधिक सतर्क करण्याचा निर्णय घेतला आहे. गर्दीला अटकाव करण्यासाठी नियोजन केले आहे.
फोटो ओळी :
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत आठ दिवसांच्या कडक लॉकडाऊननंतर सोमवारी सौदे सुरू झाले. यावेळी खरेदीदारांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी महापालिका आरोग्य विभागाने अँटिजन चाचण्या केल्या. (फाेटो-२४०५२०२१-कोल-बाजार समिती व बाजार समिती०१) (छाया - दीपक जाधव)