कळंबा : उपनगरे व लगतच्या ग्रामीण भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत असणाऱ्या कळंबा तलावात पोहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत शेकडो लोकांची गर्दी सकाळी तलावात पहावयास मिळते.
जिल्ह्यात कोरोनाच्या साथीच्या आजाराने थैमान घातले असतानाच नागरिकांच्या हलगर्जीपणापुढे प्रशासन हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. लॉकडाऊन, जनता कर्फ्यूसारखे कडक उपाय करूनही जिल्ह्यातील कोरोनाच्या संसर्गाची साखळी कमी होत नसल्याने प्रशासनातर्फे संक्रमण रोखण्यासाठी जमावबंदी आदेश जारी करण्यात आला आहे. तरीही सुरक्षित अंतराचे भान न ठेवता तलावावर नागरिक गर्दी करीत आहेत. त्यामुळे बेफिकिरी वाढत चालल्याचे दिसून येत आहे.
कळंबा तलावातील पाण्याचा वापर मुख्यतः पिण्यासाठी केला जात असून आजमितीला तलावातील पाणी आंघोळ, गाड्या व जनावरे धुणे यासाठी जास्त होत आहे. पालिका मालकीच्या कळंबा तलावावर देखभाल दुरुस्तीसाठी पालिका प्रशासनाने एकही कर्मचारी नियुक्त केला नसल्याने तलावाचा गैरवापर होत आहे. कळंबा ग्रामपंचायतीला पिण्यासाठी कळंबा तलावातील पाणी लागते तर तलाव प्रदूषणमुक्त ठेवण्याच्या प्रश्नी मात्र प्रशासन हात वर करते ही दुर्दैवी बाब आहे.
वाढत्या प्रदुषणामुळे तलावातील पाण्याचा नैसर्गिक रंग बदलून पाणी हिरवट बनले आहे. तसेच पाण्याला उग्र वास येत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. वाढत्या प्रदुषणामुळे पाण्यातील फॉस्फेटचे प्रमाण वाढल्याने तलावातील जैवविविधता धोक्यात आली आहे. तलावाच्या शेजारी करवीर पोलीस ठाण्याची पोलीस चौकी असून ऐन कोरोनाच्या साथीच्या जीवघेण्या आजारात गर्दी करणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर कडक कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांतून होत आहे.
चौकट : तलाव परिसरात फिरायला येणाऱ्यांची संख्या सायंकाळी प्रचंड असून रात्री उशिरापर्यंत तलाव परिसरात गर्दी आढळून येते. एकंदरीत सकाळी रस्त्यावर गर्दी दुपारी नीरव शांतता तर सायंकाळी पुन्हा वर्दळ असे चित्र जमावबंदी काळात कळंबा व लगतच्या उपनगर परिसरात दिसते. त्यामुळे पुन्हा कडक कारवाईचा बडगा उगारण्याची गरज निर्माण झाली आहे.
फोटो : २९ कळंबा तलाव
ओळ
जमावबंदीच्या काळातही कळंबा तलावात पोहण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळत आहे.