लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहर व परिसरात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने ११ ते १६ मेपर्यंत जनता कर्फ्यूचा निर्णय जाहीर केला. तसेच लसीकरणाचा पुरवठा कमी होत असल्याने शासकीय सहा केंद्रांवर लसीकरण सुरू ठेवण्यात आले आहे. यामुळे नागरिकांची केंद्रांवर गर्दी होत आहे. लसीकरणासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून, नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
कोरोना महामारीला रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. नागरिकांची गर्दी आटोक्यात आणण्याच्यादृष्टीने शहर सनियंत्रण समितीने शहरात जनता कर्फ्यू लागू केला आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. मात्र, लसीकरण केंद्रांची संख्या कमी केल्यामुळे उपलब्ध केंद्रावर नागरिकांची गर्दी होत आहे. सकाळपासूनच अनेकजण केंद्रावर रांगेत उभे राहत आहेत. गर्दीमुळे सोशल डिस्टन्सच्या नियमांचे उल्लंघन होत आहे.
इचलकरंजी शहराची लोकसंख्या पाहता लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत प्रशासन एकीकडे कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत आहे, दुसरीकडे लसीकरण केंद्रांची संख्या कमी करत आहे. मोजक्याच केंद्रांवर लस उपलब्ध असल्याने गर्दी निर्माण होत आहे. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शासनाकडून लोकसंख्येच्या प्रमाणत लसींचा पुरवठा कमी होत आहे. जेवढे डोस उपलब्ध असतील, त्या प्रमाणात केंद्रास वाटप केले जाते. सध्या लस कमी मिळत असल्यामुळे केंद्रांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे. पुरवठा वाढल्यास पुन्हा केंद्रांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी दिली.