ठाणो : अखेर काँग्रेसमधून डेरेदाखल झालेले रवींद्र फाटक यांना शिवसेनेने ठाणो शहर मतदारसंघाची उमेदवारी दिली आहे. अखेरच्या क्षणी त्यांची उमेदवारी घोषित करून शिवसेनेने जरी बंडोबांचे बंड थोपवले असले तरी अनेक निष्ठावान शिवसैनिकांनी थेट शिंदे यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. ज्या एकनाथ शिंदेंनी फाटकांचे विधानसभेचे फाटक बंद, असे पोस्टर शहरभर लावले होते, त्याच शिंदेंनी फाटकांना उमेदवारी देऊन विधानसभेचे कवाड उघडे केल्याने निष्ठावान शिवसैनिक नाराज झाले आहेत. त्यामुळे फाटकांना येथे मतांचा कौल घेण्यासाठी प्रथम नाराज निष्ठावंतांना आपलेसे करून मतांचा जोगवा मागावा लागणार आहे.
फाटकांची लढत आता राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे, काँग्रेसचे नारायण पवार, भाजपाचे संजय केळकर आणि मनसेचे निलेश चव्हाण यांच्याशी होणार आहे. 19 जुलै रोजी फाटक यांनी आमदारकीच्या आश्वासनावर शिवसेनेत प्रवेश केला होता. परंतु, त्यांच्या नावाला सुरुवातीपासूनच विरोध होता. फाटक यांनी बाळासाहेबांच्या विरोधात आवाज उठवला, ज्याने कोपरी भागातील पोटनिवडणुकीत शिवसैनिकांना मारहाण केली, त्यात काहींची बोटे मोडली होती, तर काहींनी शिवसेनेखातर डोकी फोडून घेतली होती. असे असतानाही त्याच फाटकांना शिवसेनेत प्रवेश दिल्याने नाराजीचा सूर उमटला होता. त्यांना जर तिकीट दिले तर याचे तीव्र परिणाम भोगावे लागतील, असे संकेतही निष्ठावंतांनी दिले होते. अखेर, निष्ठावंतांची नाराजी अव्हेरून शिवसेनेने फाटकांच्याच गळ्यात ठाणो शहर विधानसभेची माळ घातल्याने 9 इच्छुकांसह निष्ठावान शिवसैनिकांची घोर निराशा झाली आहे. गद्दाराला तिकीट दिल्याने अनेकांनी थेट एकनाथ शिंदेंवरच हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केला. ज्या गद्दाराने शिवसैनिकाला मारले, शिवीगाळ केली, शिवसेनेवर हल्लाबोल केला, त्याच गद्दारासाठी कसे काम करायचे, असा खडा सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे.
यापूर्वी शिवसेनेने फाटकांचे विधानसभेचे द्वार उघडण्यासाठी महापौरपदाच्या निवडणुकीत निष्ठावंतांना थोपविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, फाटकांसाठी निष्ठावान काम करतील, असा गेम प्लॅन शिवसेनेत शिजला होता. परंतु, त्यांचा हा प्लॅन अखेर फोल ठरला आहे.
या मतदारसंघातून नरेश म्हस्के, अनंत तरे, हरिश्चंद्र पाटील, अनिता बिज्रे, केदार दिघे, अशोक वैती आदींची नावे चर्चेत होती. त्यामुळे निष्ठावंतांना कसे डावलायचे, असा यक्षप्रश्न शिवसेनेपुढे होता. त्यामुळे त्यांची मनधरणी करण्यासाठी शिवसेनेने शुक्रवारी सकाळी सूर्या येथील कार्यालयात बैठक बोलवली होती. परंतु, बंडखोरीची शक्यता लक्षात घेऊन आणि फाटकांच्या विरोधात निष्ठावान शिवसैनिक भडकून उठेल, या भीतीने ही बैठकच एकनाथ शिंदेंनी रद्द केल्याची माहिती सूत्रंनी दिली. त्यानंतर, या बैठकीसाठी पुन्हा शिवसैनिकांना आणि पदाधिका:यांना शनिवारी सकाळी पाचारण करण्यात आले. या वेळी चर्चा होईल आणि त्यानंतरच उमेदवार घोषित केला जाईल, अशी आशा शिवसैनिकांना होती. परंतु, पक्षश्रेष्ठींनी या निष्ठावंतांना खोटे ठरवून फाटकांना उमेदवारी दिल्याची घोषणा करून त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिवसैनिकांना पाचारण केले. त्यामुळे शिवसैनिक नाराज झाले. परंतु, उमेदवारी अर्ज भरताना केवळ एकनाथ शिंदे, महापौर संजय मोरे, माजी महापौर हरिश्चंद्र पाटील आदी उपस्थित होते. परंतु म्हस्के, तरे यांच्यासह अनेक निष्ठावान शिवसैनिकांनी या ठिकाणाहून काढता पाय घेतला. त्यामुळे बंडखोरांना थोपविण्याच्या नादात अंतर्गत बंडखोरीचा सामना आता शिवसेनेबरोबर फाटकांना करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)
च्कोपरीतील पोटनिवडणुकीनंतर लागलेल्या पोस्टर्समध्ये रवींद्र फाटक यांचे विधानसभेचे फाटक बंद, अशा आशयाचा उल्लेख करण्यात आला होता. विशेष म्हणजे हाती भगवा घेतलेले एकनाथ शिंदेही यात दिसत होते.