विश्वास पाटील -- कोल्हापूर -राज्यातील साखर कारखान्यांची धुराडी आता १ डिसेंबरनंतरच पेटणार असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. राज्यात उसाचे उत्पादन यंदा कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रतिवर्षी १ आॅक्टोबरपासून हंगाम सुरू होत असे. यंदा तब्बल दोन महिने तो पुढे गेला आहे.यंदा ऊस कमी असल्यामुळे हंगाम १५ नोव्हेंबरनंतरच सुरू व्हावा, अशी साखर कारखानदारांची मागणी होती. कारण दिवाळी २ नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे हा सण झाल्यावरच ऊसतोडणी मजुरांच्या टोळ्या येतात. परतीचा पाऊस अजूनही सुरू आहे. तो अजून किती दिवस सुरू राहील, याचा अंदाज नाही. नोव्हेंबरपासून हंगाम सुरू झाला तरी तो फेब्रुवारी अखेरपर्यंत चालू शकेल, असा अंदाज आहे. परंतु, सीमाभागातील कारखान्यांचा हंगाम लवकर सुरू करण्यास परवानगी द्या वी, अशी मागणी होती. त्याचीही दखल घेण्यात आली. जे कारखाने सीमाभागातील आहेत, त्यांना सहकारमंत्री व साखर आयुक्तांच्या परवानगीनंतर १५ नोव्हेंबरपासून हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे मुख्यत: कोल्हापूर व सांगली जिल्'ांतील कारखान्यांना हंगाम लवकर सुरू करण्यास मुभा मिळू शकेल.गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात सुमारे दोन कोटी टनांची घट आहे. दुष्काळामुळे पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उसाचे पीक काढले आणि जे होते त्याची पाण्याअभावी पुरेशी वाढ न झाल्याने हा फटका बसला आहे. जे पीक आहे, त्यातही खोडव्याचे प्रमाण जास्त आहे. पाऊस पडल्यानंतरच त्याची वाढ सुरू झाली आहे. त्यामुळे हंगाम लवकर सुरू झाल्यास त्याच्या उत्पादनावरही परिणाम होईल असा विचार झाला. राज्याची प्रतिदिन गाळप क्षमता पाच लाख ६० हजारांपर्यंत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ५५० लाख टन उसाचे गाळप करायचे झाल्यासही १०० दिवस पुरेसे आहेत. याचा अर्थच असा आहे की, यंदाचा हंगाम सरासरी ३० दिवसांपासून १०० दिवसांपर्यंतच चालू शकणार आहे. त्यामुळे तो जरी एक डिसेंबरपासून सुरु झाला तरी चांगला उतारा असलेल्या काळातच गाळप होवू शकेल याचाही विचार झाला.बैठकीत आमदार अजित पवार यांनी एक डिसेंबर ही तारीख जाहीर केल्यावर मुख्यमंत्र्यांनीही त्यास लगेच संमती दिली असल्याचे सांगण्यात आले. ही बैठक मुख्यमंत्र्यांच्या कार्यबाहुल्यामुळे रात्री आठनंतर सुरू झाली. त्यास मुख्यमंत्री फडणवीस, सहकार मंत्री सुभाष देशमुख, आमदार अजित पवार, राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे, कार्यकारी संचालक संजीव बाबर, साखर आयुक्त डॉ. विपीन शर्मा, आदी मान्यवर उपस्थित होते.ऊस परिषदेचे काय ?हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २५ आॅक्टोबरला जयसिंगपूरला ऊस परिषद घेतली आहे. परंतु, त्यानंतर तब्बल महिन्याभराने हंगाम सुरू होणार असल्याने ऊस परिषदही पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.२०१६-१७ चे संभाव्य गाळपऊस गाळप : ५०० लाख टनसाखर उत्पादन : ६० लाख टनसरासरी हंगाम दिवस : ३० ते ९०२०१५-१६ चा हंगामहंगाम घेतलेले कारखाने : १७७ऊस गाळप : ७४३.२८ लाख टनसाखर उत्पादन : ८४.०० लाख टनसरासरी साखर उतारा : ११.३१
राज्यातील गळीत हंगाम डिसेंबरपासून
By admin | Published: October 04, 2016 1:07 AM