अतुल आंबी --इचलकरंजी--कबनूर (ता. हातकणंगले) येथे पिण्याच्या पाण्यासह मुख्य मार्गावरील वाहतुकीचा प्रश्न, त्याचबरोबर डिजिटल फलकांचा विळखा हे प्रश्न प्रामुख्याने गंभीर बनले आहेत. इचलकरंजी शहराजवळील सर्वांत मोठे गाव असूनही कबनूरमधील अनेक समस्यांकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे.कबनूर येथे चार वर्षांपूर्वी जलस्वराज्य प्रकल्प उभारून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात आला. मात्र, या प्रकल्पाच्या निर्मितीमधील त्रुटींमुळे वारंवार नादुरुस्त होऊन पाणी शुद्धिकरण प्रक्रिया ठप्प होते. त्यामुळे गावाला पाणीपुरवठा करताना मोठी अडचण निर्माण होते. गावभागात दोन ते तीन दिवस, तर वाढीव वसाहतींमध्ये आठ दिवसांतून एक वेळ असा पाणीपुरवठा काही वेळा केला जातो. या पाणीप्रश्नावरून अनेकवेळा महिलांनी आंदोलने केली आहेत. येथील जलस्वराज्य प्रकल्प हस्तांतरण करण्याचेही काम प्रलंबितच आहे. त्यामुळे ग्रामपंचायत पूर्णपणे या प्रकल्पावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. हा पेच सोडविण्यासाठी स्थानिक नेतेमंडळींनी लक्ष घालून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे.ग्रामपंचायतीच्यावतीने सात लाख रुपयांचा गांडूळ खत प्रकल्पही राबविण्यात आला. मात्र, त्यामध्येही गांडुळांचे व खतांचे प्रमाण कमी असून, ग्रामपंचायतीला त्याचा म्हणावा तसा लाभ झाला नाही. पंचायतीच्या दुर्लक्षपणामुळेच हा प्रकार घडला. इचलकरंजी-कोल्हापूर मार्गावर जाताना कबनूर गावातूनच पुढे जावे लागते. तसेच साखर कारखान्यामुळे हंगाम काळात वाढणारी उसाची वाहतूक तसेच गुरुवारी ग्रामदैवत असलेल्या जंदीसो ब्रॉनसो दर्ग्याला होणारी भाविकांची गर्दी अशा कारणांमुळे कबनूर चौकात रहदारीचा प्रश्न खूपच कठीण बनला आहे. तसेच कबनूर येथील अंतर्गत रस्तेही खूप वर्षांपासून दुरावस्थेत आहेत. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालणे आवश्यक आहे. इचलकरंजी नाक्यापासून ते कबनूर ओढ्यापर्यंत उड्डाण पुलावरून या ट्रॅफिक जामवर मार्ग काढला जाऊ शकतो, असेही जाणकारांचे मत आहे.गावामध्ये अनेक चौकांत डिजिटल फलकांनी विळखा घातल्यामुळे गावाचे विद्रुपीकरण झाल्याचे दिसत आहे. ग्रामपंचायतीने गावसभेत ठराव करून याबाबत निर्णय घ्यावा, असे नागरिकांचे मत आहे. कबनूरचा कचरा डेपो ओढ्याच्या वरील बाजूस कोल्हापूर रोडलगत आहे. तेथेही वारंवार आग लागून कचऱ्यासह प्लास्टिक जळून परिसरात धूर व दुर्गंधी पसरते. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या सर्व समस्यांवर लक्ष घालून लोकप्रतिनिधींनी मार्ग काढावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. (समाप्त)बॉयलरमधील राखेमुळे समस्याकबनूर येथील साखर कारखान्यामुळेही हंगाम काळात बॉयलरमधून राख उडून कबनूरसह इचलकरंजीमधील काही भागात घरांवर, तसेच बाहेर लावलेल्या गाड्यांवर, वाळत घातलेल्या कपड्यांवर पडून काळे होत असल्याने याचाही नागरिकांना त्रास होतो. साखर कारखाना प्रशासनाने जादा फॅन लावून हा प्रश्न सोडविणार असल्याचे गतवर्षी आंदोलकांना सांगितले होते. मात्र, तसे घडले नाही.
कबनूरला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर
By admin | Published: October 04, 2015 11:17 PM