कोल्हापूर : महाराष्ट्राप्रमाणेच अमेरिकेतही सध्या गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे. विशेष म्हणजे येथील सर्वच गणेशमूर्ती पर्यावरणानुकूल आहेत. केवळ महाराष्ट्रीयनच नव्हे, तर सर्व भारतीय एकत्र येऊन हा गणेशोत्सव साजरा करतात. या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे.१९६०-७० च्या दशकात मराठी लोक उच्चशिक्षणासाठी अमेरिकेतील विद्यापीठात येऊ लागले. विद्यापीठातील भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली तशी इंडियन स्टुडंट्स असोसिएशन्स स्थापन होऊ लागली आणि त्यातूनच पुढे मराठी मंडळे आकार घेऊ लागली. १९६९ मध्ये अमेरिकेतील पहिले मराठी मंडळ शिकागोत स्थापन झाले. गणपती उत्सवाने सर्वच नवीन मंडळांचा प्रारंभ होत राहिला आणि अजूनही होत आहे , असे मोहन रानडे यांनी सांगितले.अमेरिकेत पाण्याची वानवा नाही; पण गणपतीची मूर्तीच काय, पण इतर कशानेही प्रदूषण होणार नाही. यासाठी कायदे आहेत. येथे सुरुवातीपासूनच मराठी मंडळे विसर्जन करताना रीतसर परवानगी घेतात आणि प्लास्टर आॅफ पॅरीस आणि पाण्यात प्रदूषण होणारे घटक सोडून इतर साहित्यांनी गणपती मूर्ती बनवीत आहेत, अथवा नुसत्या तसबीरीची अथवा धातूच्या मूर्तीची पूजा केली जात आहे, असेही ते म्हणाले. न्यू जर्सीच्या डॉ. घाणेकर दाम्पत्याने सुरू केलेला घरगुती गणेशोत्सव आता सार्वजनिक झाला असला तरी स्वरूप अजूनही साधे आणि सुसंस्कृत राहिले आहे, हे विशेष. १९७३ पासून डॉक्टर गीता आणि रमेश घाणेकर हे स्वत: गणेशमूर्ती घरीच हातांनी बनवितात.फिलाडेल्फियाचा मोदकातील गणेशफिलाडेल्फिया गणेश फेस्टिव्हलचे हे १५ वे वर्ष आहे. यावर्षी मोदकात विराजमान झालेल्या बाप्पांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. हा मोदक लवचिक पट्ट्या, कागद आणि कपड्यापासून बनविला आहे. ही मूर्ती पर्यावरणासाठी अनुकूल असून, ती पेपर माँचेपासून बनविलेली आहे. तसेच नॉन टॉक्सिक रंगाने रंगविलेली आहे. यामुळे पाण्यातील माशांना त्याचा त्रास होत नाही. फिलाडेल्फिया गणेश फेस्टिव्हल भारतात सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना मदतही केली जाते.शार्लट मराठी मंडळातर्फे पूरग्रस्तांना लाखाची मदतगेल्या ३८ वर्षांपासून हिंदू सेंटरचा गणपती उत्सव शार्लट मराठी मंडळाच्या पुढाकाराने साजरा होत आहे. अप्पा जोशी, गीताताई जोशी यांच्या नि:स्पृह सेवेचं यात मोठ योगदान आहे. या सेंटरच्या गणेशोत्सवातील महाप्रसादावेळी कोल्हापूर परिसरातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी ठेवलेल्या दानपेटीत एक लाख रुपये जमा झाले. ते बृहन्महाराष्टÑ मंडळाच्या वतीने महाराष्ट्र फौंडेशनतर्फे पूरग्रस्तांना दिले जाणार असल्याची माहिती मंडळाचे विश्वस्त सचिन ढवळीकर यांनी दिली.
अमेरिकेतील पर्यावरणपूरक गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 12:29 AM