कोल्हापूर : परदेशात वाढत्या कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील महापालिका हद्दीत २२ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत रात्री अकरा ते सकाळी सहा या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबतचे आदेश सोमवारी दिले. या संदर्भात महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी महापालिकेची पथके तयार केली असून पथकातील कर्मचारी या काळात गस्त घालणार आहेत.परदेशात कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला असून तेथे पुन्हा या संसर्गाने हाहाकार माजवला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने लॉकडाऊन अंतर्गत पुन्हा काही बंधने घातली आहेत. २२ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत ख्रिसमसच्या सुट्या आणि ३१ डिसेंबर येत असल्याने सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची व कोरोना संसर्गाची भीती आहे.
त्यामुळे खबरदारीचा प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्य शासनाने या काळात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्तीवर फौजदारी कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे.