जयसिंगपूर : संचारबंदी आणि मागणीअभावी झेंडू फुलांचे दर कोसळले आहेत. परिणामी बाजारात फुलांची मागणी घटल्याने झेंडू उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. मुंबई बाजारपेठेत मागणी घटली आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही पुन्हा एकदा लॉकडाऊनमुळे मोठा फटका फूल उत्पादक शेतकऱ्यांना बसल्याचे दिसत आहे. रविवारी फुलांचा दर वीस रुपयांवर होता.
कोरोना महामारीमुळे गतवर्षी शासनाने संचारबंदी लागू केली होती. याचा फटका फूल उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता. यंदाही संचारबंदी व लॉकडाऊनमुळे पुन्हा एकदा फुलशेती अडचणीत आली आहे. मंदिरे बंद करण्यात आल्याने आणखीन संकटात भर पडली आहे. लग्नसराईवर देखील निर्बंध आणण्यात आले आहेत. सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रम देखील बंद आहेत. त्यामुळे फुलांची विक्री मंदावली आहे. मुंबई बाजारपेठेत देखील फुलांची मागणी घटली आहे. विक्री कमी होत असल्यामुळे दर कोसळले आहेत. शिरोळ तालुक्यातील नांदणी, कोथळी, शिरोळ परिसरातून फूल उत्पादक शेतकरी मुंबई बाजारपेठेत फुले पाठवितात. मात्र, दर पडल्याने मर्यादा आल्या आहेत.
कोट - शासनाकडून मदतीची गरज
बाजारात फुलांचा दर स्थिर नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. शिवाय, फुलांची मागणीदेखील घटली आहे. भांगलणीचा खर्चदेखील निघत नाही. फूल उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय मदत द्यावी.
- अरुण टारे, शेतकरी
फोटो - १८०४२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - शिरोळ येथील शेतकऱ्याने घेतलेले झेंडू फुलाचे उत्पादन.