प्रकाश पाटील - कोपार्डे -कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मुदत जानेवारी २०१५ मध्ये संपली असली, तरी साखर सहसंचालक कार्यालयाकडून कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रमाला गती मिळाली नसल्याने निवडणूक होणार की, विद्यमान संचालक मंडळाला आणखी सहा महिने मुदतवाढ मिळणार यासह अनेक प्रश्नांच्या चर्चेला ऊत आला आहे. कोणतीही तांत्रिक त्रुटी शिल्लक नसतानाही निवडणूक कार्यक्रम जाहीर न झाल्याने कार्यक्षेत्रात याबाबत चर्चा सुरू झाली आहे.जिल्ह्यातील शिखर संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर मुदत संपलेल्या सर्वच साखर कारखान्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. यात भोगावती, बिद्री कारखान्यांच्या निवडणुकीसाठी वाढीव सभासदांच्या असणाऱ्या न्यायालयीन प्रश्नामुळे तांत्रिक त्रुटीत या कारखान्यांच्या निवडणुका अडकल्या. मात्र, कुंभी-कासारीच्या संस्था गटाची जागा कायम ठेवण्याचा सहकार निबंधकांच्या आदेशाला कारखाना प्रशासनाकडून सहकारमंत्र्यांकडे आव्हान देण्यात आले. सर्वसाधारण सभेत ही जागा सर्वसाधारण गटात घेण्याबाबत निर्णय झाला होता. तोही कारखाना प्रशासनाच्या बाजूने निर्णय होऊन संस्था गटाची जागा रद्द करण्यात आली होती. हा निर्णय घेऊन दोन महिने झाले.त्यानंतर साखर सहसंचालक कार्यालयाकडून वर्तमानपत्रात जाहिरात देऊन संस्थांना कुंभी-कासारीच्या २०१५-२० च्या निवडणुकीसाठी राखीव जागांसाठी मतदान करण्याच्या अधिकारासाठी ठराव देण्याचे निवेदन दिले. त्याची मुदतही ३० एप्रिलला संपली. तरीही कच्ची, पक्की मतदारयादी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध होऊन त्याबाबत हरकती होणे क्रमप्राप्त होते. मात्र, याबाबत कोणतीही कारवाई मे महिन्याचा पंधरवडा उलटला तरी झाली नसल्याने कधी घेणार? तसेच तो वेळेत व्हावा याबाबत कुंभी बचाव मंचने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानंतर साखर सहसंचालक कार्यालयाला जाग आली असून, दोनच दिवसांपूर्वी या कार्यालयाने निवडणूक प्रक्रियेबाबत आपल्याकडून सहकार्य होत नाही त्याबाबत आपल्यावर सहकार कायद्यांतर्गत कारवाई का केली जाऊ नये, असा लेखी जाब विचारला आहे.यानंतर प्रशासनाने कच्ची यादी सादर करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. मात्र, यातही त्रुटी असल्याने त्या काढण्यासाठी प्रशासनाला सांगण्यात आले आहे. त्यामुळे कारखाना प्रशासन साखर सहसंचालक कार्यालयाला मदत करत नाही की वारंवार कागदोपत्री त्रुटी ठेवून कालावधी पुढे ढकलला जातो आहे. जेणेकरून निवडणुका पावसाळी वातावरणाचे कारण देत पुढे ढकलायच्या असे नियोजन आहे, अशी चर्चा कार्यक्षेत्रात सुरू झाली आहे.विरोधकांकडून तयारीविधानसभेच्या निवडणुकीपासून आमदार चंद्रदीप नरके यांच्या विजयाने पी. एन. पाटील समर्थक आक्रमक झाले आहेत. हाच शाहू आघाडी व कुंभी बचाव मंच कुंभी-कासारीमध्ये आमदार नरके यांच्या विरोधात आहे. विधानसभेत झालेल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी विरोधक सज्ज आहेत, तर २६४० प्रमाणे उच्चांकी ऊसदर देऊन शेतकरी सभासदांची सहानुभूती मिळवून ती कॅश करण्याचा प्रयत्न आमदार नरके करणार हे निश्चित; पण हे सर्व निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच पाहायला मिळणार आहे.
कुंभी-कासारी कारखान्याच्या निवडणुकीबाबत उत्सुकता
By admin | Published: May 19, 2015 12:40 AM