संतोष पाटील -कोल्हापूर शहरात मोफत वाय-फाय सुविधा नेमकी कधी सुरू होणार, किती वेळ किंवा डाटा मोफत वापरास मिळणार, इंटरनेटचे स्पीड काय असणार, शहरातील सध्या १ लाख ५० हजार मोबाईल इंटरनेटधारकांसाठी आवश्यक सेवा उपलब्ध होणार काय, अशा अनेक प्रश्नांबाबत शहरवासीयांत कमालीची उत्सुकता आहे. मनपा प्रशासनास अद्याप चार वाय-फाय पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी संपर्क साधला आहे. वाय-फाय संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यास किमान सहा महिन्यांची कालावधी लागण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.कोलकाता शहरात ५ फेब्रुवारी २०१५पासून मोफत वाय-फाय सेवा सुरू झाली. देशात प्रथम कोलकाता शहराने ‘वायफाय सिटी’ होण्याचा मान मिळविला आहे. रिलायन्स कंपनीने कोलकातामध्ये ५०० किलोमीटर अंतर लेड केबल्स टाकली आहे. त्याद्वारे ३० एप्रिल २०१५ पर्यंत शहरातील १४९ वॉर्डात २५५ ते ५०० केबीबीएसपर्यंत मोफत इंटरनेट सेवा पुरविली जाणार आहे. संपूर्ण शहरवासीयांनी एकाचवेळी ही सेवा वापरली तरी किमान ५० केबीबीएसपेक्षा कमी इंटरनेटचा वेग येणार नाही, असा कंपनीना दावा आहे. काहीशा याच धर्तीवर मात्र, वेगळ्या तंत्रज्ञानावर आधारीत वाय-फाय सेवा आता कोल्हापूरकरांना उपलब्ध होणार आहे. वायफाय सुविधेसाठी मनपाला वर्षाला किमान २.२५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दरवर्षी त्यामध्ये वाढच होणार आहे. काही वर्षे ही सुविधा मोफत पुरविल्यानंतर शहरातील सव्वा लाख मिळकतधारकांच्या घरफाळ्यात १०० ते ३०० रुपयांपर्यंत वाढ करून ही सुविधेचे पैसे भागविण्याचा विचार केला जाणार आहे. शहरात ३.५० लाख मोबाईलधारक आहेत. त्यातील किमान १ लाख ५० हजार लोक इंटरनेटचा वापर मोबाईलद्वारे करतात. यासाठी महिन्याला किमान १०० ते १२०० रुपयांपर्यंत पैसे खर्च करतात, त्यामानाने ही वार्षिक आकारणी स्वस्त असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. घरगुती किंवा मर्यादित वायफाय वापरांसाठीचे एक हॉटस्पॉट किमान २० मीटरपर्यंतचा परिसरात सेवा देतो. सार्वजनिक वापरासाठीचे वायफायचे हॉटस्पॉट १०० ते २०० मीटरपर्यंतचा परिसरात उत्तम सेवा देतात. शहरातील विजेच्या खांबावर म्युनिसिपल वायरलेस नेटवर्कद्वारे वाय-फाय अँटिना बसविण्यात येईल. शहरात किमान शंभराहून अधिक ठिकाणी असे अँटिने बसविले जातील. प्रत्येकाला पासवर्ड दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात काही ठराविक वेळ किंवा ५० ते १०० एमबीपर्यंत डाटा दिवसभरात मोफत वापरण्यास मिळेल. दुसऱ्या टप्प्यात त्याचा अमर्यादपणे वापरास मुभा दिली जाणार आहे. वाय-फायशी जोडले जाण्यापूर्वी एका विशिष्ट लिंकवरून कनेक्ट होता येईल, जेणेकरून त्या लिंकवरील जाहिरातीमधून वायफाय जोडणाऱ्या कंपनीला आर्थिक फायदा होणार आहे, या धर्तीवर शहर वाय-फाय होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.शहर वाय-फाय करण्यासाठी चार कंपन्या उत्सुक आहेत. स्पर्धा निविदेद्वारे कमी दर व उत्कृष्ट सेवा देणाऱ्या कंपनीला ही सुविधा पुरविण्याचा ठेका दिला जाईल. शहरातील वायफाय सेवा थ्री-जीच्या स्पीडने पूर्णपणे मोफत असेल. लवकरच याचे प्रत्यक्ष काम सुरू होईल. - आदिल फरास (स्थायी समिती सभापती)
‘वाय-फाय सिटी’बाबत उत्सुकता
By admin | Published: March 31, 2015 11:44 PM