अजून शेणीच.. कोल्हापुरातील अंत्यसंस्काराच्या पारंपरिक पद्धतीबाबत अजित पवारांना कुतूहल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 05:55 PM2022-01-19T17:55:38+5:302022-01-19T18:05:56+5:30
प्रा. पाटील यांचे पार्थिव चितेवर ठेवून त्यामध्ये कापूर घालण्यात आला. त्यावर विस्तव ठेवण्यात आला. मंत्री पवार यांना तेवढ्याने कसा अग्नी लागणार याबद्दल उत्सुकता होती. त्याला बाहेरून भडाग्नी का देत नाही, अशी विचारणा ते तेथील कर्मचाऱ्यांना करत होते.
कोल्हापूर : कोल्हापुरात अजून शेणी वापरूनच अंत्यसंस्कार होतात, येथे विद्युतदाहिनी का नाही अशी विचारणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी येथे केली. ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्यावर येथील कसबा बावडा परिसरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यासाठी उपमुख्यमंत्री पवार हे उपस्थित होते. कुठे जाईल तेथील पध्दती, व्यवहार आणि प्रश्न समजून घेण्याची पवार कुटुंबीयांची सवय आहे. त्यास अनुसरून पवार यांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राजू लाटकर यांच्याकडून कोल्हापुरातील अंत्यसंस्काराच्या स्थितीची माहिती घेतली.
प्रा. पाटील यांचे पार्थिव चितेवर ठेवून त्यामध्ये कापूर घालण्यात आला. त्यावर विस्तव ठेवण्यात आला. मंत्री पवार यांना तेवढ्याने कसा अग्नी लागणार याबद्दल उत्सुकता होती. त्याला बाहेरून भडाग्नी का देत नाही, अशी विचारणा ते तेथील कर्मचाऱ्यांना करत होते. कोल्हापुरात अशीच पध्दत असून वारे लागले की चितेला अग्नी लागेल असे स्मशानभूमीतील कर्मचाऱ्याने सांगितले. शेजारीच लाटकर उभे होते. त्यांच्याकडे त्यांनी अजून शेणी वापरूनच का अंत्यसंस्कार करत असल्याची विचारणा केली.
कोल्हापुरात चार स्मशानभूमी आहेत. परंतु सगळीकडे याच पारंपरिक पध्दतीने अंत्यसंस्कार केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी महापालिका शेणी व लाकूड मोफत उपलब्ध करून देत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यावर त्यांनी जगभरात विद्युतदाहिनीचा वापर केला जात असताना कोल्हापुरात मात्र अजूनही शेणीच का वापरतात अशी विचारणा केली. कोल्हापुरात डिझेल दाहिनीचीही सोय आहे. परंतु फक्त कोरोनाच्या काळातच तिचा वापर झाला. त्यानंतर तिथे अंत्यसंस्कार होत नाहीत.
मृत्यूनंतरही आपल्या जवळच्या व्यक्तीस विजेचे चटके बसू नयेत अशी मानसिकता स्थानिक लोकांची आहे. त्यामुळे येथे डिझेल किंवा विद्युतदाहिनीच लोक स्वीकारत नसल्याचे पत्रकारांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. प्रा. पाटील यांच्या चितेस पूर्ण अग्नी लागल्याची खात्री झाल्यावरच उपमुख्यमंत्री पवार स्मशानभूमीतून बाहेर पडले.