कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या प्रारूप यादीवरील हरकतींची सुनावणी पूर्ण झाली. आक्षेपांमध्ये अनेक गमतीजमती समोर आल्याने निकालाबाबत संस्थांमध्ये उत्सुकता आहे. सोमवारी सकाळी अकरा वाजता विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर हे निकाल देणार आहेत.
‘गोकुळ’च्या यादीवर ७१ हरकती आल्या होत्या. त्यातील ३५ हरकती या दुबार ठरावांवर होत्या. सुनावणीदरम्यान १४ जणांनी माघार घेतली, तर तीन तक्रारदार गैरहजर राहिल्याने १८ दुबार ठरावधारकांचे म्हणणे दाखल झाले. यामध्ये सासू मृत झाल्यानंतर दोन्ही सुनांनी ठरावावर दावा केला आहे. आता अधिकृत ठरावधारक सून कोण? हे शोधण्याचे काम दुग्ध विभागाला करायचे आहे. अशा गमतीजमती सुनावणीदरम्यान समोर आल्या आहेत. दोन संचालक मंडळ उपस्थित करून ठरावाला आव्हान दिले आहे. सहा संस्थांचे ठरावच बदला, अशी मागणी राधानगरीतील एकाने केली आहे. यासह इतर हरकतींवर दुग्ध विभाग काय निकाल देतो, याबाबत उत्सुकता लागली आहे.
निवडणुकीबाबत ‘गोकुळ’ने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी आहे. मात्र दुग्ध विभाग नियोजित वेळापत्रकानुसार सकाळी अकरा वाजताच निकाल देऊ शकतो. निकालाचा परिणाम अंतिम यादीवर होऊ शकतो.