कोल्हापूर : मराठी रंगभूमीची आगेकूच यशस्वीपणे सुरू राहण्यासाठी सातत्याने लिहिणारे द्रष्टे नाटककार निर्माण होणे महत्त्वाचे आहे. या रंगभूमीची सद्य:स्थिती ‘जेमतेम’ असल्याची खंत ज्येष्ठ नाट्य समीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे यांनी बुधवारी येथे व्यक्त केली.शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागातर्फे आयोजित ‘रंगमंचीय कला : वर्तमानकालीन बदलते प्रवाह’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या विभागातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार होते.डॉ. देशपांडे म्हणाले, अर्थकारण, समाजकारण, आदींचा परिणाम प्रेक्षकांच्या जीवनशैलीवर होतो, त्यातून मानसिकता बदलते. सध्या कमी वेळात चटपटीत पाहण्याकडे लोकांचा कल वाढला. त्यातूनच गेल्या दहा वर्षांत प्रबोधन बाजूला पडले आणि उथळ मनोरंजनाने त्याची जागा घेतली आहे. एकीकडे प्रवाहीपणाचा आग्रह कायम असतानाच नाटकांच्या आकारावरही परिणाम झाला आहे. पाच अंकांवरून तीन अंकांवर आलेले नाटक आता, तर दोन अंकी, एकांकिका किंवा दीर्घांकी बनले असून, त्याचा एकूण दर्जावर परिणाम झाल्याचे दिसते. रंगभूमी टिकण्यासाठी लेखन करणाऱ्यांत तसेच प्रयोग सादर करणाऱ्यांत सातत्याचा अभाव आहे. दमदार लिहिणारे युवक आजही आहेत; पण काळाच्या प्रवाहात ते पुढे कुठे लुप्त होतात, ते समजत नाही. हा सातत्याचा अभाव रंगभूमीला मारक आहे. लेखनात ताकद असेल, तरच ती भूमिका कलाकारासाठी आव्हानात्मक ठरू शकते. आज तसे दिसत नाही. मराठी माणसाच्या आयुष्यात मराठी रंगभूमीचे स्थान मोठे आहे. प्रेक्षकांच्या अभिरुचीचा घसरत चाललेला दर्जा पाहता प्रेक्षकांसाठीही रसास्वाद कार्यशाळा व्हाव्यात. सद्य:स्थिती ‘जेमतेम’ असलेली ही रंगभूमी प्रगल्भ होण्यासाठी भाषांतर, रूपांतर या गोष्टी आवश्यक आहेत. कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, रंगभूमीच्या क्षेत्रातील जागतिक, स्थानिक बदलते प्रवाह समजून घेण्यासाठी ही राष्ट्रीय परिषद उपयुक्त ठरेल. कार्यक्रमास कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे, विश्वनाथ शिंदे, केशव देशपांडे, आदी उपस्थित होते. अधिविभाग प्रमुख डॉ. एन. व्ही. चिटणीस यांनी स्वागत केले. आदित्य मैंदर्गीकर यांनी सूत्रसंचालन केले. निखिल भगत यांनी आभार मानले.स्पर्धांचे अमाप पीक...दहा वर्षांत रंगभूमीशी निगडित स्पर्धांचे अमाप पीक आले आहे. त्यांचा पैसा व प्रसिद्धी मिळविण्यासाठी, दूरचित्रवाणी व रूपेरी पडद्याकडे जाण्यासाठी वापर केला जातो आहे, हे चिंताजनक असल्याचे मत डॉ. देशपांडे यांनी व्यक्त केले.
मराठी रंगभूमीची सद्य:स्थिती ‘जेमतेम’
By admin | Published: February 12, 2015 12:16 AM