इंदुमती गणेशकोल्हापूर : ‘एक वक्त था जब रात को कोई दरवाजा खटखटाता था, हम जान मुठ्ठी में लेके बाहर आते थे, लोगों को इकठ्ठा करके बेमतलब तंग किया जाता था, जवानों को मारा जाता था, लडकी के साथ बुरा न हो इसिलिए १८ साल मे ही मेरी बहन की शादी करा दी गई... आज भी कभी दंगे फसाद होते है पर हमें आदत हो गई, इतना सुकून है की, पहले से जादा अमन और शांती है... कही बताई बातों पे विश्वास ना करें... निडर होके कश्मीर आईये आपका स्वागत है...’ हे शब्द आहेत काश्मीरमधील सामाजिक परिस्थितीने हाेरपळलेल्या मुलींचे. अनुभवांच्या चटक्यांवर फुंकर मारून त्या नव्या वाटा, नव्या दिशांकडे झेप घेत आहेत.बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या पुढाकारातून सध्या जम्मू-काश्मीरमधील ४० मुली कोल्हापुरात आल्या आहेत. कोल्हापुरी पाहुणचाराने त्या जाम खुश झाल्या. नवं काही बघितल्याचा आणि अनुभवल्याचा आनंद त्यांच्या गोऱ्यापान चेहऱ्यावर आणि भुऱ्या डोळ्यांमधून तरळत होता. या मुली कुपवाडा, जम्मू, काश्मीर येथील निवासी आश्रमशाळांमध्ये राहतात. यातील सर्वात लहान मुलगी आहे पाच वर्षांची. तिला आपण संस्थेत कसे आलो माहीत नाही. अनेक मुलींचे आई किंवा वडील किंवा दोघेही काश्मीरमध्ये झालेल्या दंगली, अतिरेकी हल्ले व गोळीबार अशा दुर्घटनांमध्ये मृत्युमुखी पडले आहेत.सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असलेली बसेरा ए तबस्सुम म्हणते, ‘‘आम्ही फार वाईट परिस्थितीमधून इथपर्यंत आलो आहाेत. वडील वारले, आई कसं तरी घर चालवते. मी संस्थेत येऊन १६ वर्ष झाली. अनेक मुली चांगल्या शिकून नोकरी करत आहेत, घराची जबाबदारी पेलत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे.’’ नगीना बशीर या १४ वर्षांच्या मुलीला पाच बहिणी, एक भाऊ आहे. तिला डॉक्टर व्हायचे आहे. गुलशन आरा, निकिता, आफरिना अशा सगळ्या मुलींची कहाणी वेगळी आहे, पण दु:खाचा धागा एकच आहे. परिस्थितीच्या काट्यांवरून चालताना होणाऱ्या वेदना मागे सोडताना त्यांच्यामध्ये नवे ध्येय गाठण्याची इच्छा आहे आणि समान धाग्याने त्यांना बांधून ठेवले आहे.
सरकारे कौन सी भी हो, आम आदमीही मरता हैतुम्हाला काश्मीर सरकारकडून काय अपेक्षा आहे? यावर तबस्सुम ही आश्रमशाळेचे मॅनेजमेंट बघणारी मुलगी म्हणाली, ‘‘दंगे, फसात, गोळीबार कुणामध्येही होवो, सरकारे कौन सी भी हो आम आदमीही मरता है... आम्हाला आता इथल्या परिस्थितीची सवय झाली आहे. पण भविष्यात हे चित्र बदलेल, अशी आशा आहे. आमच्याकडे बेरोजगारी प्रचंड आहे. उत्पन्नाच्या साधनांवर मर्यादा आहे. राेजगार मिळाला की अर्धे प्रश्न आपोआप मिटतील.’’