लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : राजू शेट्टीसारख्या जबाबदार नेत्याला अशाप्रकारची वक्तव्य शोभत नाही, दुसऱ्यांना शिव्या शाप देणे, चिखलफेक करणे व नाहक आरोप करणे बरे नव्हे, जनतेच्या आशीर्वादाने आपण लाभार्थी झाल्याचा असा पलटवार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजू शेट्टी यांच्यावर केला.
‘स्वाभिमानी’च्या आक्रोश मोर्चात, ‘हसन मुश्रीफ माझ्या नादाला लागू नका, महागात पडेल’ असा इशारा शेट्टी यांनी दिला होता. त्याबाबत मंत्री मुश्रीफ म्हणाले, महापुरातील नुकसानीचे ‘एसडीआरएफ’ निकषांनुसार प्राथमिक नुकसानभरपाईचा निर्णय झाला आहे. अंतिम निर्णय अद्याप नाही. पाणी गेलेल्या घरमालकांच्या खात्यावर दहा हजारांप्रमाणे पैसे जमा होत आहेत. पिकांच्या पंचनामे अंतिम टप्प्यात असताना शेट्टी यांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. निर्णय झालेला नाही, त्यामुळे मोर्चा काढू नका, असे आपण व पालकमंत्री सतेज पाटील यांनी विनंती केली होती तरीही मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता, अलीकडे त्यांच्या वक्तव्यांवरुन त्यांनी दिशा बदलल्याचे दिसते, असे सांगितले. गेली ३०-३५ वर्षे आपण सामाजिक कार्यकर्ता आहे, लोकांची सेवा करत जनतेच्या आशीर्वादाने लाभार्थी झालो. जिल्ह्यात पक्षातील एकालाच मंत्रिपद मिळते, ज्याप्रमाणे ‘स्वाभिमानी’मधून केवळ शेट्टीच आमदार, खासदार झाले. प्रतिमा बनवण्यासाठी आम्हाला अनेक वर्षे खर्ची घालावी लागली, वक्तव्ये करताना कोणाचा अपमान होणार नाही, मने दुखावणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. राजकारणात चढ-उतार येत असतात. मात्र, दुसऱ्याला शिव्या-शाप देऊन परिस्थिती बदलत नसते.