कुरुंदवाड : शहरातील खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करावी, या मागणीसाठी पालिका प्रशासनाच्या विरोधात शहर बचाव कृती समितीच्या वतीने जुना बसस्थानक परिसरात रस्त्यावरील खड्ड्यांत वळकटी आंदोलन केले. तीन तासांहून अधिक काळ आंदोलन करूनही मुख्याधिकारी निखिल जाधव न आल्याने आंदोलन ठिकाणी पालिका बांधकाम अभियंता योगेश गुरव, प्रभारी नगराध्यक्ष सुनील चव्हाण यांनी भेट देऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी मुख्याधिकारीच आले पाहिजेत अशी भूमिका घेतली. मात्र, मुख्याधिकारी न आल्याने वाद चिघळत असल्याने पोलिसांनी आंदोलकांना अटक करून सुटका केली. आंदोलनाचे नेतृत्व कृती समिती अध्यक्ष अर्शद बागवान, राजू आवळे, सुनील कुरुंदवाडे यांनी केले.
दरम्यान, मुख्याधिकारी जाधव मनमानी कारभार करीत पोलिसांच्या साहाय्याने आंदोलन मोडून काढण्याच्या प्रकार केल्याचा आरोप करत मुख्याधिकारी यांच्या निषेधार्थ आज, मंगळवारी शहर बंदची हाक दिली आहे. त्यामुळे आंदोलन अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.
शहरातील अंतर्गत रस्ते अत्यंत खराब झाल्याने व रस्ता दुरुस्त करण्याची वारंवार मागणी करूनही दखल घेतली नसल्याने शहर बचाव कृती समितीच्या वतीने शहरातील खड्ड्यांत वळकटी आंदोलन केले. आंदोलकांनी कडकलक्ष्मी सोबत शहरातील रस्त्यावरून अंगावर फटके मारून घेत जुना बसस्थानक रस्त्यावर आले. रस्त्यावरील खड्ड्यांत वळकटी टाकून आंदोलकांनी आंदोलन सुरू केले. दुपारी पालिका बांधकाम अभियंता गुरव, प्रभारी नगराध्यक्ष चव्हाण निवेदन स्वीकारण्यासाठी व आंदोलकांची समजूत काढण्यासाठी आले. मात्र, आंदोलकांनी आंदोलन ठिकाणी मुख्याधिकारी जाधव आले पाहिजे अशी भूमिका घेतली. मुख्याधिकारी निखिल जाधव आंदोलन ठिकाणी येणार नसल्याने व आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन अटक केली व लगेच सुटकाही करण्यात आली.
आंदोलनात कृती समिती अध्यक्ष अर्शद बागवान, राजू आवळे, सुनील कुरुंदवाडे, स्वाभिमानी संघटनेचे अण्णासाहेब चौगुले, बबलू पवार, सिकंदर सारवान, राजू शेख, आयुब पट्टेकरी, राजू बेले, राजू देवकाते, दिनेश कांबळे, विलास उगळे, सुनील जुगळे, गोटू बंडगर, आदी सहभागी झाले होते.
फोटो - २३०८२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - कुरुंदवाड येथे रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी शहर बचाव कृती समितीच्या वतीने जुना बसस्थानक रस्त्यावरील खड्ड्यांत वळकटी आंदोलन केले. यावेळी अर्शद बागवान, राजू आवळे, सुनील कुरुंदवाडे उपस्थित होते.