कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीने भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांना कोल्हापूरच्या न्यायालयात दुपारी दाखल करण्यात आले तेव्हा तपासासाठी सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.
ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीने यापूर्वीच चार जणांवर संशय व्यक्त केला असून कोल्हापूर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने आता भरत कुरणे (वय ३७ ) आणि वासुदेव सूर्यवंशी (वय २९) यांनाही कर्नाटकच्या तपास पथकाकडून ताब्यात घेतले आहे.
यातील संशयित भरत कुरणे याला यापूर्वी ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणीही ताब्यात घेतलेले आहे. या दोघांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना कोल्हापूरच्या न्यायालयासमोर उभे केले. त्यांना अधिक तपासासाठी विशेष पथकाच्या ताब्यात देण्यात आले असून सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कुरणे आणि सूर्यवंशी हे पानसरे यांच्या खूनाच्या कटासाठी झालेल्या बैठकीत सहभागी असल्याचे उघड होत आहे. त्यामुळे त्यांची चौकशी पोलिस करणार आहेत. मोटरसायकल आणि पिस्टनची विल्हेवाट या दोघांनीच लावल्याचा संशय आहे.
यापूर्वी या गुन्ह्यात एसआयटीने समीर गायकवाड, डॉ. वीरेंद्र तावडे या दोघांना अटक केली होती तसेच विनय बाबूराव पवार व सारंग दिलीप अकोळकर हे फरार आहेत. आतापर्यंत एसआयटीने केलेल्या तपासाचा पुरवणी अहवाल उच्च न्यायालयात सादर केला जाणार आहे.
त्यामध्ये अमोल काळे याच्या आठ दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले असून ते न्यायालयासमोर ठेवले जाणार आहेत. हा संपूर्ण तपास गोपनीय असल्याने एसआयटीने तपासाची माहिती बाहेर पडू नये याची दक्षता घेतली आहे.