कमी पेट्रोल देणारा कर्मचारी ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरातील एका पेट्रोल पंपावर कमी पेट्रोल देऊन ग्राहकांची लूट करत असल्याचे सतेज फायटर ग्रुपने उघडकीस आणले. याप्रकरणी एकास शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आदित्य हेमंत केतकर (वय २०, रा. यशवंत कॉलनी) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार गुरुवारी सकाळी घडला. पेट्रोल दरवाढीच्या काळात हा प्रकार घडल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, जयहिंद मंडळासमोर असलेल्या पेट्रोल पंपावर एक लिटर पेट्रोलमध्ये ७५० मिलीच पेट्रोल दिले जात होते. दररोज सकाळच्या सुमारास पंप सुरू करण्यापूर्वी चाचणी करण्यासाठी मापकातून एकदाच वाहनधारकांना पेट्रोल दिले जाते. परंतु हा प्रकार दिवसभर सुरूच होता. तब्बल पाचवेळा वाहनधारकांना ७५० मिली पेट्रोल दिले गेले.
दरम्यान, एका वाहनधारकाने मापकातून पेट्रोल देण्याची मागणी केली. यावेळी ७५० मिली पेट्रोल आढळून आले. त्यामुळे त्याची फसवणूक झाल्याने याबाबत जाब विचारला. परंतु कर्मचाऱ्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे सतेज फायटर ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी त्याला व पेट्रोल पंपाला घेराव घातला. ही माहिती समजताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी प्राथमिक माहिती घेऊन कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत याबाबत नोंद झाली नव्हती.