गुन्हेगारी क्षेत्राचा विस्तार पोलीस खात्याची चिंता वाढवणारी बाब बनली आहे, पण या वाढत्या गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलीस नवनवीन अत्याधुनिक साधनांचा, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहे. कोणतीही घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासन हे वेळेत घटनास्थळी पोहचणे हे तितकेच महत्त्वाचे असते. पोलीस घटनास्थळी वेळेत पोहचल्यानंतर परिस्थती नियंत्रणात आणण्यास वेळ लागत नाही. म्हणूनच आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत करण्यासाठी, घटनास्थळी वेळेत पोहचण्यासाठी राज्यातील पोलीस दलाने अत्याधुनिक यंत्रणा सज्ज ठेवली आहे. कोणतीही घटना घडल्यास तातडीने ‘११२ नंबर डायल’ करा, अवघ्या दहाव्या मिनिटाला पोलीस घटनास्थळी दाखल होतील. ही अतिशयोक्ती नव्हे, केंद्र सरकारने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी व सर्वसामान्यांना तत्काळ मदत मिळवून देण्यासाठी नवी यंत्रणा राज्यभर विस्तारली आहे, या नव्या यंत्रणेचे नियंत्रण हे नवी मुंबईतून होत आहे. चोवीस तास सेवेत तत्पर असणारी ही नवी अत्याधुनिक यंत्रणा गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरणार हे निश्चित.
विनाकाम झटपट पैसे कमवण्याचे आजच्या दिशाहीन बनलेल्या तरुण पिढीचे स्वप्ने देशहिताला मारक ठरत आहेत. रुबाबात चारचाकी आलिशान वाहनातून फिरण्याचे प्रमुख स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही पिढी चोरी, घरफोडी तसेच गुंडगिरी, अवैध व्यवसायाचा आसरा घेत आहेत. गुंडगिरीच्या मायाजालमध्ये तरुण पिढी गुरफटत निघाली आहे, त्यातून काही राजकारणी अमाप पैशांचा वापर करून गुन्हेगारी प्रवृत्तीला अप्रत्यक्ष प्रोत्साहन देत असल्याचेही उघड आहे. तरुण मुलांकडून प्रसंगी सहज पैसे मिळवण्यासाठी तस्करीचाही मार्ग अवलंबायला जात आहे. आर्थिक विवंचनेत असलेले हे तरुण आपोआपच गुन्हेगारी क्षेत्राकडे वळले जात आहे. गुन्हेगारीचा वाढता विस्तार पोलीस प्रशासनासमोर आव्हान बनला आहे. गुन्हेगारीला रोखण्यासाठी अमेरिकेच्या धरतीवर महाराष्ट्रात केंद्र सरकारने नवा उपक्रम सुरू केला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत त्यांनी गुन्हेगारी विश्वाला नेस्तानाबूत करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. कोणत्याही ठिकाणी, कोणतीही घटना घडो, अगर एखाद्याच्या संशयास्पद हालचाली, अगर आपत्कालीन परिस्थितीत मदत हवी आहे अशा वेळी संबंधिताने फोनवरून ११२ नंबर डायल केल्यास त्याला अवघ्या दहा मिनिटात पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मदत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुढील अनर्थ टळणार आहे. या नव्या तंत्रज्ञानाने वाढती गुन्हेगारी कमी होण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे.
महाराष्ट्राच्या कोणत्याही कोना-कोपऱ्यातून पोलिसांच्या ११२ नंबरला डायल केल्यास त्याचे केंद्रीकरण नवी मुंबइत केले आहे. तो फोन थेट नवी मुंबई येथील नियंत्रण कक्षात जाणार आहे. तेथे या फोनचे लोकेशन दिसणार आहे. तेथून ज्या भागातून फोन आला, त्या जिल्ह्यातील नियंत्रण कक्षाला नवी मुंबईतून फोन जाऊन त्यांना आलेल्या फोनचे लोकेशन दिले जाणार आहे. ज्या भागातून फोन कॉल आला, त्या परिसरातील पोलिसांच्या बीट मार्शल व्हॅनला संदेश देऊन ते तातडीने घटनास्थळी पोहचतील. त्यामुळे फोन कॉल केल्यानंतर अवघ्या दहाव्या मिनिटाला पोलीस घटनास्थळी हजर राहून परिस्थितीचा सामना करणार आहेत. एखाद्या ठिकाणी गुन्हेगारी कृत्य घडत असेल तर या नव्या अत्याधुनिक यंत्रणेमुळे त्याला आळा बसण्यास मदत होईल. राज्यात फोनवर तक्रारींचा ओघ वाढल्यास नवी मुंबईतील नियंत्रण कक्षावर भलताच ताण पडणार आहे, त्यानंतर याच नियंत्रण कक्षाचे नागपूर येथेही एक विभागीय कार्यालय सुरू करण्यात येईल आहे. या महाराष्ट्राचे आधुनिक तंत्रज्ञानात दोन भाग करून जास्तीत जास्त पोलीस यंत्रणा सक्रिय ठेवण्याचा पोलीस दलाचा कयास आहे. ही गतिमान यंत्रणा म्हणजे गुन्हेगारी क्षेत्राचा कर्दनकाळ ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
फोटो : पोलीस व्हॅन, तानाजी पोवार
270821\27kol_8_27082021_5.jpg~270821\27kol_9_27082021_5.jpg
फोटो : पोलीस व्हॅन, तानाजी पोवार~फोटो : पोलीस व्हॅन, तानाजी पोवार