कोल्हापूर : येथील सायबर महाविद्यालय व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये अंदाजे १५ परदेशी विद्यार्थी विशेष करून आफ्रिकन विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना 'सायबर'च्यावतीने जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली.
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर खूप लोकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात सायबरमधील समाजकार्य विभागाचे डॉ. दीपक भोसले काही आजी-माजी विद्यार्थ्यांच्या संपर्कात असून, त्यांच्यामार्फत काही गोष्टींचा पाठपुरावा करीत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी परदेशी विद्यार्थ्यांशी संपर्क केला असता असे निदर्शनास आले की, कोरोनामुळे या परदेशी विद्यार्थ्यांचे देखील दैनंदिन जीवन कठीण बनले आहे.
सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीमुळे या विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ते लक्षात घेता डॉ. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र जनवाडे, प्रताप कांबळे, ओंकार कुर्ले, स्रेहा कांबळे, संदीप खोत, स्वप्नील गोजेकर या विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात या परदेशी विद्यार्थ्यांना काही दिवस पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तू दिल्या. एरेडी सोमे, ख्रिस ओमवेगा आणि साफि फिलिप्स, आदी परदेशी विद्यार्थ्यांना मदत केली. याबद्दल या विद्यार्थ्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. या उपक्रमासाठी सायबरचे व्यवस्थापकीय विश्वस्त व सचिव डॉ. रणजित शिंदे, संचालक डॉ. चंद्रकांत दळवी, एस. व्ही. शिरोळ, प्रशासकीय अधिकारी विनायक साळोखे यांचे सहकार्य लाभले.
कोल्हापुरातील सायबर महाविद्यालयातर्फे केनियास्थित परदेशी विद्यार्थी नैरोबी मोझेस आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांसाठी जीवनावश्यक वस्तू विद्यार्थी प्रतिनिधी स्वप्नील गोजेकर यांनी दिल्या.