कोल्हापूर : गर्दीने ओसंडून वाहणारे चौक, सजलेले विसर्जन कुंड, दान होणाऱ्या मूर्तींची लागलेली रांग असे दरवर्षी सायबर आणि कोटीतीर्थवर दिसणारे वातावरण यंदा मात्र दिसले नाही. याऐवजी मंडळांनी उभारलेले मंडप, तिथे ठेवलेले कुंड आणि मैदानात मूर्तिदानसाठी केलेली व्यवस्था आणि त्यासाठी लागलेली रांग असे काळानुसार बदल अंगीकारत विसर्जन पार पडले.
कोटीतीर्थ तलावामध्ये मूर्ती विसर्जनास निर्बंध घालण्यात आले होते. बाहेरच मूर्ती आणि निर्माल्य संकलन केले जात होते. शाहू मिल चौकात तर जत्रा भरल्यासारखे वातावरण होते. पाऊस नसल्याने सहकुटुंब विसर्जनासाठी येत होते. चौकात कुंड उभे करून मूर्ती संकलित केल्या जात होत्या.
राजारामपुरी येथेदेखील 9 नंबर शाळेच्या मैदानावर मूर्तिदान आणि कुंडाची व्यवस्था करण्यात आली होती. येथे मोठा मंडप उभारण्यात आला होता. येथे विसर्जनासाठी मोठी रांग लागली होती.
पुढे शिवाजी विद्यापीठ रोडवर दौलतनगर येथे समाजमंदिराच्या मोकळ्या जागेत विसर्जन व्यवस्था करण्यात आली होती. सायबरला दरवर्षी कुंड ठेवून तिथे मूर्ती संकलन होत होते. यावर्षी मात्र तिथे काहीही नव्हते. परिसर सुनासुना होता.