सचिन भोसले ।कोल्हापूर : दूरवरून शिक्षणासाठी पायपीट करणाऱ्या विद्यार्थ्यांची गरज ओळखून पिंपरी-चिंचवड येथील निसर्ग सायकल मित्र या संस्थेमार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शाळांना आतापर्यंत १०० हून अधिक नव्या जुन्या सायकली ‘सायकल बँक’ या संकल्पनेद्वारे भेट दिल्या आहेत.
जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये गरीब विद्यार्थ्यांना किमान दहा ते १५ कि.मी. अंतर चालून शाळेत शिक्षणसाठी जावे लागते. यात विद्यार्थ्यांना एवढी पायपीट करावी लागल्यामुळे शाळेतून गळतीचे प्रमाण अधिक होते. यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. ही बाब ध्यानी घेऊन मूळचे सांगली येथील व सध्या पिंपरी-चिंचवड येथे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अभियंता असलेले सुनील पाटील यांनी मित्र सुनील ननवरे, अतुल माने यांच्याकडे अशा विद्यार्थ्यांकरिता ‘सायकल बँक’सुरू केली तर काय होईल, असा प्रस्ताव मांडला. सुरुवातीला लुधियाना येथून १५ सायकली विकत घेऊन सांगलीतील एका शाळेला भेट दिल्या.
बँकेच्या संकल्पनेला प्रतिसाद मिळू लागला. कुरुंदवाड (ता. शिरोळ) येथील सौ. वि. ख. माने कन्या माध्यमिक विद्यालयातील मुलींना ५०, तर रत्नागिरी येथील श्रीमती सरस्वती रावजीशेट जाधव हायस्कूल, किंजळे (ता. खेड, रत्नागिरी) या शाळेने १० सायकलींची मागणी या बँकेकडे नोंदविली. यासाठी या चौघांनी निसर्ग सायकल मित्रद्वारे फेसबुक व अन्य समाजमाध्यमांद्वारे जुन्या व वापरात नसलेल्या परंतु चांगल्या स्थितीतील सायकली दान देण्याबाबत आवाहन केले आहे.
यातून सद्य:स्थितीत २५ नवीन सायकलींचा निधी तयार झाला आहे. या सायकली त्या शाळांना लवकरच दिल्या जातील. यापूर्वीही सांगलीसह कोल्हापुरातील अनेक शाळांना ‘सायकल बँके’द्वारे शंभरहून अधिक नव्या, जुन्या सायकली भेट दिल्या आहेत.
सायकल बँक संकल्पना अशीया बँकेद्वारे दिलेली सायकल कायमस्वरूपी शाळेला दिली जाते. यात गरजू विद्यार्थ्यांना ती दिली जाते. त्याचे शिक्षण पूर्ण झाले की विद्यार्थी आपली सायकल पुन्हा शाळेकडे जमा करतो, अशी सायकल बँकेची संकल्पना आहे. यासाठी ज्या नागरिकांकडे अशा सायकली पडून असतील त्यांनी त्या या बँकेकडे दिल्या तर त्याचा वापर होईल आणि गरजू विद्यार्थ्यांची पायपीट वाचेल. याशिवाय ज्या शाळेत उपक्रम राबवायचा आहे, त्या शाळांनी निसर्ग सायकल मित्रकडे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेमार्फत केले आहे.
ज्यांच्याकडे पडून असलेल्या व सुस्थितीतील सायकली असतील त्या सायकल बँकेद्वारे गरजू विद्यार्थ्यांना दिल्या जातात. त्यामुळे नागरिकांकडे पडून असलेल्या अशा सायकली आमच्याकडे जमा कराव्यात. त्यातून अनेक विद्यार्थ्यांची पायपीट वाचेल. - सुनील पाटील, सायकल बँकेचे प्रवर्तक