कोल्हापूर : पुणे येथील माऊंटन सायकलिस्ट ग्रुपतर्फे आयोजित सायकल मोहिमेतील सहभागी युवकांचा राजस्थानमध्ये अपघात झाला. त्यातील गारगोटी येथील संतोष देसाई आणि कीर्तिराज देसाई हे युवक किरकोळ जखमी असून ते सुखरूप आहेत. बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ते राजस्थान येथून पुण्याच्या दिशेने रवाना झाले. या अपघातात प्रवीण ताकवले (वय ३१) यांचे निधन झाले.
‘सायकल चालवा, प्रदूषण टाळा, पाणी वाचवा’ हा संदेश देण्यासाठी माऊंटन सायकलिस्ट ग्रुपतर्फे दि. १३ ते ३१ आॅगस्टदरम्यान जम्मू ते पुणेपर्यंत सायकल मोहीम आयोजित केली. १३ आॅगस्टला वैष्णवीदेवीचे दर्शन घेऊन जम्मू येथून या ग्रुपने या मोहिमेची सुरुवात केली. त्यामध्ये संतोष आणि कीर्तिराज देसाई यांच्यासह पुणे, बारामतीतील आठजणांचा समावेश होता. ते सायकलिंग करीत अमृतसर, भटिंडा, वाघा बॉर्डरमार्गे राजस्थान येथे पोहोचले. खिंवसर येथून साधारणत: पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या एका पेट्रोलपंपाजवळ या मोहिमेतील प्रवीण, संतोष, कीर्तिराज आणि सुभाष हे मुक्कामासाठी मंगळवारी (दि. २१) रात्री थांबले.
या पंपापासून जवळ असलेल्या एका ढाब्यावरून जेवण करून चालत परतत होते. ते रस्त्याच्या बाजूने चालत असताना रात्री पावणेनऊच्या सुमारास भरधाव ट्रकने त्यांना पाठीमागून ठोकरले. त्यात प्रवीण ताकवले यांचे निधन झाले. ते पुणे येथील किरकटवाडीतील रहिवासी असून अभिनव कला महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. संतोष आणि कीर्तिराज देसाई, सुभाष कुचीक (जुन्नर) हे किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर खिंवसर परिसरातील रुग्णालयात उपचार केले. ते बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पुणे येथे येण्यासाठी रवाना झाले. दरम्यान, या अपघाताचे वृत्त समजताच देसाई यांचे कुटुंबीय अस्वस्थ झाले. संतोष, कीर्तिराज सुखरूप असल्याचे कळताच त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
माऊंटन सायकलिस्ट ग्रुपच्या सामाजिक संदेश देणाऱ्या सायकल मोहिमेत आम्ही पहिल्यांदाच सहभागी झालो. मोहिमची सुरुवात चांगली झाली. राजस्थाननंतर गुजरातमार्गे आम्ही महाराष्ट्रात येणार होतो. मात्र, मंगळवारी रात्री झालेल्या अपघातात आमचे एक सहकारी मृत्युमुखी पडले, त्याचे मोठे दु:ख आहे. इतर सर्वजण सुखरूप आहेत. - संतोष देसाई