कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे बंद असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग सुरू करण्यासाठी रविवारपर्यंत ७५९ उद्योजकांना परवानगी मिळाली आहे. त्यांपैकी आठ ते दहा टक्के उद्योग सुरू झाले आहेत. तीसहून अधिक दिवस बंद असलेल्या यंत्रांची साफसफाई, दुरुस्तीची कामे सध्या सुरू आहेत. आज, सोमवारची सुटी असल्याने बहुतांश उद्योगांची चक्रे मंगळवार (दि. २८) पासून गतिमान होणार आहेत.
राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणाऱ्या आणि कारखान्यामध्ये कामगारांच्या राहण्याची व्यवस्था असलेले उद्योग सुरू करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) संकेतस्थळावरून आॅनलाईन परवानगी दिली जात आहे. अर्ज केलेल्या ७५९ उद्योजकांना आतापर्यंत परवानगी मिळाली आहे. त्यात कागल-पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील तीन ते चार मोठे उद्योग सुरू झाले आहेत. शिरोली, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतींमधील आठ ते दहा टक्के उद्योगांची सुरुवात झाली आहे.
परवानगी घेतलेल्या अधिकतर उद्योगांमध्ये यंत्रांची साफसफाई, दुरुस्तीची कामे सध्या करण्यात येत आहेत. कामगारांची निवास अथवा वाहतुकीची व्यवस्था झालेल्या उद्योगांकडून परवानगी घेण्याबाबतची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यामुळे मंगळवारपासून कार्यान्वित होणाºया उद्योगांची संख्या वाढेल, अशी शक्यता उद्योजकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, उद्योग सुरू करण्याच्या परवानगीसाठी अर्ज करणाºया उद्योगांची संख्या वाढली असल्याचे ‘एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी धनाजी इंगळे यांनी सांगितले.‘एमआयडीसी’ परिसरातील कामगारांना परवानगी मिळावीसुमारे ६० टक्के कामगार हे एमआयडीसींपासून पाच ते आठ किलोमीटर परिसरात राहतात. त्यांतील पाच-सहा किलोमीटर परिसरातील कामगारांना कारखान्यांमध्ये चालत येणे शक्य आहे. सात ते दहा किलोमीटर परिसरातील कामगारांना कामावर येण्यासाठी दुचाकी वापरण्याची परवानगी मिळाल्यास उद्योग सुरू होण्याची प्रक्रिया वाढेल. त्या दृष्टीने शासनाने परवानगी देण्याची सकारात्मक कार्यवाही करावी, अशी मागणी ‘स्मॅक’चे अध्यक्ष अतुल पाटील यांनी रविवारी केली.शहरातील उद्योगांना लॉकडाऊन संपण्याची प्रतीक्षामहानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीतील कारखाने, उद्योग सुरू करण्यास सध्या परवानगी नाही. त्यामुळे येथील उद्योजकांना लॉकडाऊन संपण्याची प्रतीक्षा लागली आहे.