नूल :नूल-निलजी मार्गावर ट्रॅक्टरने पाठीमागून धडक दिल्याने ऊसाचे वाडे आणण्यासाठी निघालेल्या सायकलस्वार तरूणाचा जागीच मृत्यू झाला. शाहरूख नन्नुसाब सनदी (वय २४, रा. नूल, ता. गडहिंग्लज) असे त्या दुर्देवी तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी ट्रॅक्टरचालक सूरज सयाजी चव्हाण (रा. नूल, ता. गडहिंग्लज) याच्याविरूद्ध गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसातून मिळालेली माहिती अशी, मंगळवार (१) रोजी पहाटे पावणे चारच्या सुमारास शाहरूख हा ऊसाचे वाडे आणण्यासाठी सायकलीवरून घरातून बाहेर पडला. सूरज सयाजी चव्हाण हा ऊस भरलेल्या ट्रॉल्या कारखान्याला पोहोचवण्यासाठी ट्रॅक्टर (एमएच ०९, एएल ८७८१) घेवून शेताकडे चालले होते.दरम्यान, नूल-निलजी मार्गावरील हायस्कूलनजीकच्या उताराला ट्रॅक्टरने शाहरूखच्या सायकलला धडक दिल्याने तो खाली पडला. त्यावेळी ट्रॅक्टरचे पाठीमागील मोठे चाक त्याच्या डाव्या पायावरून गेले. त्यामुळे गुडघ्याखालील पायाचा चेंदामेंदा झाला.अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्याच्या डोक्यातून व नाकातून रक्तस्राव होत होता. उपचारासाठी त्याला येथील उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील व बहिण असा परिवार आहे. शाहरूखचे वडील नन्नुसाब इब्राहिम सनदी यांच्या फिर्यादीवरून पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे.
शाहरूख एकुलतागडहिंग्लज साखर कारखान्याचे हंगामी कर्मचारी नन्नुसाब यांचा शाहरूख हा एकुलता मुलगा. गरिबीमुळे दहावीनंतर मोलमजुरी करून तो कुटुंबाला हातभार लावत होता. कामानिमित्त सकाळी बाहेरगावी जायचे ठरल्याने जनावरांना वाडे आणण्यासाठी तो पहाटे सायकलीवरून घराबाहेर पडला होता. परंतु, पहाटेच्या अंधारात काळाने त्याच्यावर झडप घातली. एकुलत्या शाहरूखलाही ७ महिन्याचा एकुलता मुलगा आहे. त्याच्या अकाली मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे.