कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, २५ जागांसाठी बुधवार (दि. ६)पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. संघाचे अंतर्गत राजकारण पाहता या वेळेलाही ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील व कृती समिती यांच्यात सामना होण्याची शक्यता आहे.
माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांची शिखर संस्था म्हणून मुख्याध्यापक संघाकडे पाहिले जाते. संघावर ज्या गटाची सत्ता, त्याचा शिक्षण क्षेत्रात दबदबा राहतो, हा इतिहास आहे. त्यामुळे संघाच्याचाव्या आपल्याकडे ठेवण्यासाठी मुख्याध्यापकांसह संस्थाचालकांची प्रतिष्ठा पणाला लागते.
संघाची २०१३ मध्ये त्रैवार्षिक निवडणूक झाली होती. यामध्ये डी. बी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल व बाबा पाटील, दत्ता पाटील, आदींच्या नेतृत्वाखालील ‘कृती समिती’चे पॅनेल अशी दुरंगी लढत झाली होती. कृती समितीने निकराची लढत दिली; पण पाटील यांच्या पॅनेलने संघाच्या चाव्या पुन्हा आपल्या हातात राखल्या. तीन वर्षांनंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू न केल्याने विरोधकांनी थेट न्यायालयात धाव घेतली.त्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, ७०६ मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध झाली आहे. सोमवार (दि. ४) पर्यंत यादीवर हरकत घेता येणार आहे.
मंगळवारी (दि. ५) अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. बुधवारी (दि. ६) उमेदवारी अर्जाचे वाटप, तर ७ ते ९ डिसेंबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. छाननीनंतर ११ ते १३ डिसेंबरपर्यंत माघारीची मुदत असून, २४ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. दुपारी चारनंतर संघाच्या कार्यालयातच मतमोजणी केली जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. सुधाकर शेरेकर काम पाहत आहेत.
संघांतर्गत हालचाली पाहता, ‘सत्तारूढविरोधात कृती समिती’ असाच सामना होण्याची शक्यता असून, निवडणुकीचे खरे चित्र अर्ज दाखल केल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. या निवडणूकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहाणार आहे, हे मात्र निश्चित.कोण असतात मतदारप्रत्येक शाळा मुख्याध्यापक संघाची सभासद असली तरी शाळेचे मुख्याध्यापक मतदान करतात. आता ७०६ मतदार आहेत. आतापर्यंत कोल्हापूर शहर व हातकणंगले, करवीर तालुक्यांचे वर्चस्व संघावर राहिले आहे.तालुकानिहाय मतदार असेहातकणंगले - ८९, शिरोळ - ५४, गगनबावडा - ९, कोल्हापूर शहर - ७०, करवीर - ८०, आजरा- २९, चंदगड-६०, पन्हाळा - ६३, कागल - ५९, भुदरगड - ४७, शाहूवाडी - ३४, गडहिंग्लज - ४९, राधानगरी - ५३.