कसबा बावडा : तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या माध्यमातून अभियांत्रिकी, कृषी, वाणिज्य, व्यवस्थापन अशा विविध शाखांचे अभ्यासक्रम एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तंत्र शिक्षणाच्या जोडीनेच लिबरल स्टडीज् व लिबरल आर्टस् ही नवी कल्पना पश्चिम महाराष्ट्रात या विद्यापीठाच्या माध्यमातून प्रथमच राबविली जात असल्याची माहिती डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी दिली.
विद्यार्थ्यांचा बौद्धिक व व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी अमेरिका व अन्य पाश्चात्य देशांच्या धर्तीवर विद्यापीठातील अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली आहे. त्यानुसार क्रिटीकल थिंकिंग, क्वान्टेटीव्ह ॲप्रोच, इंट्रामेंटल स्टडीज् हे विषय अनिवार्य असतील. शिवाय संगीत, नृत्य, नाटक, चित्रकला, स्टोन कार्विंग, क्राफ्ट, फॅशन डिझायनिंग, रंगकाम यापैकी किमान दोन अभ्यासक्रम निवडणे गरजेचे असल्याचे डॉ. गुप्ता यांनी सांगितले. बी. कॉम. शाखेमध्ये फायनान्स ॲण्ड अकौटींग, इंटरनॅशनल फायनान्स, स्ट्रॅटेजिक फायनान्स हे स्पेशलाईज अभ्यासक्रम निवडण्याची संधी मिळणार असून, बीबीएमध्ये या तीन स्पेशलाईज अभ्यासक्रमांबरोबरच ट्रॅव्हल ॲड टुरिझम मॅनेजमेंट, ॲग्रो बिझनेस मॅनेजमेंट, डिजिटल मार्केटिंग या स्पेशलाईज विषयांची निवड करता येईल. बी. एस्सी. डेटा सायन्स आणि बी. एस्सी. इकॉनॉमिक्स ॲण्ड बिझनेस हे अभ्यासक्रम या विद्यापीठात सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बी. ए. शाखेमध्येही माध्यम आणि संप्रेषण, अर्थशास्त्र, लिबरल आर्टस्, मीडिया स्टडीज्, पत्रकारिता असे विषय निवडण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
चौकट : ५०हून अधिक सामंजस्य करार
विद्यापीठात ५०हून अधिक औद्योगिक व शैक्षणिक संस्थांशी डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाने सामंजस्य करार केले आहेत. विद्यार्थी केंद्रीत प्रकल्प राबविण्याबरोबरच मल्टीमीडियाचा वापर, ग्रुप ॲक्टिव्हिटी, गेस्ट लेक्चर्स, एकास एक चर्चा, प्रश्नमंजुषा, मार्गदर्शन व प्रशिक्षण या माध्यमातून शिक्षण दिले जाणार असल्याचे डॉ. गुप्ता म्हणाले.
चौकट : व्यक्तिमत्व विकासावर भर
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अभ्याक्रमाव्यतिरिक्त प्रत्येक सत्रात सॉफ्ट स्कील ट्रेनिंग हा अतिरिक्त विषय असेल. विद्यार्थ्यांना जापनीज, फ्रेंच, जर्मन यापैकी एक परदेशी भाषा अवगत करणे आवश्यक आहे. याबाबत सर्व स्तरावरील शिक्षण विद्यापीठात उपलब्ध होणार आहे. नव्या विद्यापीठात ४०हून अधिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु असून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहनही डॉ. गुप्ता यांनी केले आहे.