राधानगरी येथे गुरुवारी गवारेड्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेवर डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. राधानगरी येथील हत्तीमहल परिसरात असलेल्या कृषी चिकित्सालयात केराबाई लक्ष्मण पोकाम या मजुरीवर काम करत असताना झुडपात लपलेल्या गव्याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. यात केराबाई गंभीर जखमी झाल्या. गव्याने आपल्या शिंगाने धडक मारत त्यांना तीन वेळा खाली पाडले. यात तिच्या बरगडी व छातीला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्राव झाला.
अतिशय गंभीर अवस्थेत त्यांना कोल्हापुरातील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
सर्जरी विभागाच्या डॉ. शीतल पाटील व डॉ. शीतल मुरचिटे यांच्या टीमने त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली.
या महिलेची प्रकृती सध्या उत्तम असल्याची माहिती डॉ. शीतल पाटील यांनी दिली. डॉ. शीतल पाटील यांच्यासह सर्व सहकाऱ्यांचे डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, अधिष्ठाता डॉ. राकेशकुमार शर्मा, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड, सर्जरी विभागप्रमुख डॉ. मानसिंगराव घाटगे यांनी अभिनंदन केले आहे.