कसबा बावडा : विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच दक्ष आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच प्लेसमेंटच्या चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात या हेतूने गेल्या ४ वर्षांपासून जापनीज, जर्मन व फ्रेंच भाषांचे शिक्षण सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर इंग्रजी संभाषण कौशल्य विकसित करण्यासाठी लँग्वेज लॅबही कार्यरत असल्याची माहिती डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी दिली.
कोल्हापूरसह लगतच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी पद्मश्री डॉ. डी. वाय पाटील यांनी कसबा बावडा येथे ३६ वर्षांपूर्वी अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली. ‘नॅक’चे ‘अ’ मानांकन प्राप्त या महविद्यालयाला नुकतीच स्वायत्तता मिळाली आहे. विद्यार्थ्यांना उत्तम अभियंता घडवतानाच त्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी महाविद्यालयाकडून नेहमीच भर दिला जात असल्याचे डॉ. गुप्ता यांनी सांगितले.
भाषा व संभाषण कौशल्य विकसित करण्यासाठी २०१५ मध्ये लँग्वेज लॅबची स्थापना करण्यात आली. त्याचबरोबर २०१७ मध्ये परदेशी भाषा शिक्षणही सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी प्रशिक्षित व अनुभवी प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी जापनीज भाषेचे एन ५ पासून एन ३ पातळीपर्यंतचे प्रमाणपत्र मिळवले असून जर्मन व फ्रेंच भाषेतही ए १ व ए २ पातळी पार केली आहे. या भाषा अवगत असलेल्या अभियंत्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून मोठी मागणी असून काही विद्यार्थ्यांना मोठ्या नोकरीची संधीही मिळाल्याचे डॉ. गुप्ता यांनी यावेळी सांगितले.