कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यातील डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे तब्बल पाच हजार सभासद एका रात्रीत कमी करून कारखाना खासगी करणाऱ्यांना, आता राजाराम कारखाना गिळंकृत करायचा आहे. ज्यांनी शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम केले, तेच आज शेतकऱ्यांचा कळवळा घेण्याचे ढोंग करत आहेत. पण, या लबाड कोल्ह्यांना राजारामचा सुज्ञ शेतकरी सभासद चांगलाच ओळखून आहे, असा टोला अमल महाडिक यांनी लगावला.ते करवीर तालुक्यातील शिये येथे झालेल्या सभासदांच्या बैठकीत बोलत होते. ते म्हणाले, निवडणुकीत प्रचाराचा कोणताही मुद्दा नसल्यामुळे केवळ भावनेच्या राजकारणावर विरोधकांचा जोर आहे. पण, विरोधकांचा हा कावा सभासदांच्या लक्षात आला असून, सभासदांनी त्यांना स्पष्टपणे नाकारल्याचे दिसत आहे. त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन बंटी पाटील असंबद्ध बोलत आहेत.कारखान्याचे संचालक डॉ. एम. बी. किडगावकर म्हणाले, कारखान्याच्या विस्तारीकरणाला विरोध करणारेच आज विस्तारीकरण का केलं नाही म्हणून विचारत आहेत. यावेळी इंद्रजित पाटील, जयसिंग पाटील, किरण जाधव, विलास जाधव, शिवाजी गाडवे, जयसिंग काशीद, बाजीराव पाटील (नाना), सुभाष पाटील, सर्जेराव पाटील, भीमराव खांटांगळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
‘डी. वाय.’ कारखाना लुटला, आता ‘राजाराम’वर नजर; अमल महाडिक यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2023 4:55 PM