कोल्हापूर : बहिणीला न्यूमोनिया झाल्यावर डॉक्टरांनी तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला परंतु सात-आठ दवाखाने पालथे घातले तरी कुणीही दाखल करून घेतले नाही परंतु डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष संजय पाटील यांना व्हॉटस्ॲपवर नुसता मेसेज करताच त्यांनी कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात तातडीने बेड उपलब्ध करून दिला. वेळेत उपचार मिळाल्याने बहिणीला जीवदान मिळाल्याची भावना सडोली खालसा (ता. करवीर) येथील राजेंद्र मारुतीराव साळोखे यांनी सोमवारी व्यक्त केली.घडले ते असे : साळोखे यांची बहीण शकुंतला मानसिंग पाटील (रा. कारभारवाडी, ता. करवीर) यांना न्यूमोनिया झाल्याचे व त्यांना तातडीने ऑक्सिजनची आवश्यकता आहे, असे स्थानिक डॉक्टरांनी सांगितले. लगेच ते बहिणीला घेऊन कोल्हापूरला उपचारासाठी आले. तोपर्यंत सायंकाळचे सात वाजले होते. त्यांनी ७ ते ८ हॉस्पिटलमध्ये चौकशी केली परंतु कुणीच बेड शिल्लक नाहीत, असे स्पष्ट सांगून दाखल करून घेतले नाही.
काहीही सुचत नव्हते. दीड तास रस्त्यांतच होतो. बहीण गाडीतच होती. अशावेळी माजी आमदार संपतराव पवार यांनी संजय पाटील यांच्याशी संपर्क साधला परंतु न झाल्याने व्हॉटस्ॲपवर मेसेज केला. संकटकाळी परमेश्वर कोणत्या ना कोणत्या रूपात येतो व मदत करतो अगदी तसेच परमेश्वर आपल्या रूपात आमच्या मदतीला आला व आम्हाला कोरोना संसर्गजन्य परिस्थितीतही बेड उपलब्ध करून ऑक्सिजनची सोय करून दिली.
सोमवारी त्यास २४ दिवस झाले बहिणीची प्रकृती आता चांगली आहे. माझी बहिणीस मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी अथक परिश्रम घेतलेल्या डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्स, नर्स व सर्व स्टाफ यांचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत. या सर्व कोरोना योद्धांना आमचा सलाम. कधीकाळी आपणास आमची माणूस म्हणून मदत लागली तर एक हाक द्या, अशीही भावना साळोखे यांनी व्यक्त केली आहे.