विश्वास पाटीलकोल्हापूर : सेन्सर व ऑर्डिनो तंत्रज्ञानाचा सुंदर वापर करून अंधांचे जगणे सुसह्य करू शकेल असा तिसरा डोळा ठरू शकणारी अनोखी काठी तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी तयार केली आहे. या काठीला भोपाळ येथील रवींद्रनाथ टागोर विद्यापीठाने घेतलेल्या राष्ट्रीय शोध शिखर प्रकल्पांतर्गत प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. संगणक विभागाचे प्रमुख डॉ. संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इशा खटावकर, केदार पवार आणि आदित्य आपटे यांनी ही काठी विकसित केली.दृष्टिहीन बांधव आता पांढरी स्टिक वापरतात. ती रस्त्यात समोर येणारी अडथळे दाखवते; परंतु आजूबाजूच्या अडथळ्यांबद्दल काहीच अवगत करत नाही. तोच मुख्य विचार करून या काठीचे संशोधन केले आहे.डॉ. संग्राम पाटील यांनी अधिक माहिती देताना सांगितले, अर्धा इंच पीव्हीसी पाइपचा वापर करून ही काठी तयार केली आहे. त्यासाठी ३० हजारांपर्यंत खर्च आला. मोठ्या प्रमाणावर अजून चांगले साहित्य वापरल्यास त्याची किंमत कमी होऊ शकेल. ही काठी अंधांचे जीवनच बदलून टाकेल.या शोध शिखर परिषदेस देशभरातून ३५० प्रकल्प सादर झाले होते. त्यातील ४५ लोकांना त्यांनी प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी निवडले. त्यातून डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या काठीस प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक व पंधरा हजार रुपये रोख बक्षीस मिळाले.
- या काठीला समोर, डाव्या आणि उजव्या बाजूला कॅमेरे आहेत. त्यामुळे चालताना काही अडथळा जवळ असेल तर ही काठी वेगवेगळ्या आवाजात संदेश देते आणि अंध बांधवांना सावध करते. तो अडथळा माणूस, प्राणी आहे की वाहन हेसुध्दा ही काठी सांगते. तसा प्रोग्रॅम त्यामध्ये स्थापित केला आहे.
- महत्त्वाचे म्हणजे काठीला एक स्विच आहे. ते दाबल्यास अंध व्यक्ती अडचणीत आहे म्हणून त्यांच्या जवळच्या पाच व्यक्तींना अंधाचे लोकेशन व मेसेज तातडीने पाठवते. भविष्यात अंध व्यक्ती कोणत्या भागात असेल त्या परिसरातील सामाजिक यंत्रणांना ही माहिती जाईल अशी व्यवस्था त्यामध्ये करण्याचा प्रयत्न आहे.
- अंध व्यक्ती कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकावरून चालत रंकाळ्याला जाणार असेल तर ही काठी त्यांना जीपीएस लोकेशन त्यांच्या कानात सांगते.