कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान म्युकरमायकोसिस या आजाराने डोके वर काढले आहे. या आजाराने ग्रस्त असलेल्या ५२ रुग्णांवर डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार करण्यात आल्याची माहिती कान-नाक-घसा विभागप्रमुख डॉ. राजश्री माने यांनी दिली.
म्युकरमायकोसिस आजारामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या बहुतांश रुग्णांमध्ये मॅक्झिलरी सायनस व वरच्या जबड्याला त्रास असल्याचे दिसून आले. या रुग्णांचे त्वरित निदान होऊन योग्य उपचार सुरू झाल्याने त्यांची दृष्टी वाचवणे शक्य झाले, तसेच याचा प्रादुर्भाव मेंदूपर्यंत पोहोचण्यापूर्वीच रोखता आला.
यातील ९० टक्के रुग्ण हे मधुमेहाने ग्रस्त होते व त्यांच्यावर अगोदरपासून मधुमेहावरील औषधोपचार सुरू होते. या ५२ रुग्णांपैकी काहीजणांवर २ ते ३ वेळा शस्त्रक्रिया करावी लागली. आतापर्यंत म्युकरमायकोसिसच्या १०४ शस्त्रक्रिया हॉस्पिटलमध्ये यशस्वीरीत्या करण्यात आल्या आहेत. यासाठी विभागप्रमुख राजश्री माने, डॉ. बाळासाहेब पाटील, डॉ. अंजना मोहिते, डॉ. वसुंधरा वरुटे, डॉ. गणेश तारळेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.