आटपाडी : आटपाडी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी जानेवारी महिन्यात १९ वाळू तस्करांवर कारवाई करून ७ लाख ७५ हजार ८७१ रुपयांचा दंड वसूल केला आहे. एप्रिल २०१४ ते जानेवारी २०१५ पर्यंत तब्बल ८३ वाहनांवर कारवाई करून ३२ लाख ७१ हजार ५४१ रुपयांचा विक्रमी दंड वसूूल केला आहे. महसूल विभागाच्या या दबंग कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.या वर्षाच्या पहिल्या महिन्यातच प्रत्येक सुटीच्यादिवशी २४ तास कार्यरत राहणाऱ्या पथकांमुळे वाळू तस्करांवर विक्रमी कारवाई करण्यात या विभागाला यश आले आहे. माणगंगा नदीसह तालुक्यातील ओढे, तलावांसह तालुक्याबाहेरून आणलेल्या चोरट्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवरही कारवाई करण्यात आली आहे.जानेवारी महिन्यात वाळू तस्करी करणाऱ्यांकडून या विभागाने दंडासह रॉयल्टी आणि उपकरांसह वसूल केलेली रक्कम अशी- संदीप माने (सांगोला, जि. सोलापूर) १ लाख ३३ हजार ३१० रुपये, विठ्ठल आबा सरगर (रा. कोळे, ता. सांगोला) ३० हजार, विक्रम राऊत ५० हजार, गुणवंत भीमराव करांडे (बोंबेवाडी) -३० हजार, गणेश बाळासाहेब पवार (बोंबेवाडी)- ३० हजार, सुनील बालटे (आटपाडी) ३० हजार, हर्षवर्धन गायली (सांगोला) - ९९ हजार ९६५ रुपये, संजय बुधावले (दिघंची) - ३० हजार, बापू चव्हाण (पांढरेवाडी) - ३० हजार, विकास चंद्रकांत विभूते (बोंबेवाडी)- ३० हजार, संभाजी रंगराव दमामे (आष्टा) - ९९ हजार ९६५, राजेंद्र लक्ष्मण यमगर (बनपुरी) -३० हजार, मनोज माणिक गायकवाड (शेटफळे) - ३० हजार, गोरख दाजी सरगर (करगणी) -३० हजार, अनिल वसंत चव्हाण (आटपाडी) -२१ हजार ४३८, दीपक भोसले (आटपाडी) - २१ हजार ४३८, राजेंद्र मोरे (दिघंची) - १९ हजार ७५५. असा एकूण ७ लाख २९ हजार ६४५ रुपये दंड, ४५ हजार ५६१ रुपये रॉयल्टी आणि ६५५ रुपये उपकर मिळून एकूण ७ लाख ७५ हजार ८७१ रुपये दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे. तहसीलदार जोगेंद्र कट्यारे यांच्यासह अव्वल कारकून एस. ए. शिंदे, मंडल अधिकारी अतुल सोनवणे, एस. एन. करांडे, बी. पी. यादव, जे. के. बागवान, नीलेश भांबुरे, गावकामगार तलाठी माणिकराव देशमुख, बी. जे. लांडगे यांनी ही कारवाई केली. (वार्ताहर)७० ब्रास वाळू जप्तवाळू तस्करी करणाऱ्या वाहनांवर महसूल विभागाचे कर्मचारी कारवाई करीत असताना आता बांधकामांवर वापरण्यात येणाऱ्या चोरट्या वाळूवरही या विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. विविध बांधकामांवरील अशी ७० ब्रास वाळू जप्त करून ती तहसील कार्यालयाच्या आवारात आणण्यात आली आहे. या वाळूचा लिलाव करण्यासाठी जिल्हाधिकारी कुशवाह यांच्याकडे प्रस्ताव पाठविला आहे.
दबंगगिरीने वाळू तस्कर हादरले
By admin | Published: February 02, 2015 11:19 PM