कोल्हापूर : स्टेशन रोडवरील दाभोळकर कॉर्नर येथील वकीलाच्या कार्यालयास आग लागून लाख रुपयाचे नुकसान झाले. आगिमध्ये फर्निचर, न्यायालयाची महत्वाची कागदपत्रके, फाईली, विद्युत साहित्याचा समावेश आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
अधिक माहिती अशी, दाभोळकर कॉर्नर येथील ‘प्रभाकर प्लाझा’ मध्ये दूसºया मजल्यावर अॅड. उमेश शिवकुमार मानगावे (रा. परिख पुल परिसर, राजारामपूरी) यांचे कार्यालय आहे. मंगळवारी कार्यालयास सुट्टी असल्याने ते दिवसभर बंद होते. रात्री अचानक कार्यालयातून धुराचे लोट बाहेर पडू लागले. शेजारील लोकांना आग लागल्याचे समजताच त्यांनी अग्निशामक दलास फोनवरुन वर्दी दिली.
काही क्षणातच पाण्याचे दोन बंब घेवून जवाण नवनाथ साबळे, पुंडलिक माने, सुरेश पाटील, शिवाजी खेडकर, हेमंत कार्ले दाखल झाले. त्यांनी दरवाजा तोडून आतमध्ये पाहिले असता आगीचे व धुराचे लोट मोठ्या प्रमाणात दिसले. कार्यालयातील संपूर्ण साहित्य खाक झाले होते.
या कार्यालयाच्या शेजारी अन्य कार्यालये होती. त्यामुळे ही आग तत्काळ आटोक्यात आनने गरजेचे होते. येथील विद्युत पुरवठा बंद करुन पाण्याच्या फवारे मारुन आग विझवली. आगीमध्ये लाकडी फर्निचर, न्यायालयाचे कागदपत्रके, विद्युत साहित्य असे सुमारे एक लाख रुपयांचे साहित्याचे नुकसान झाले.