कोल्हापूर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर, ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे व डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्या एकाच प्रकारच्या शस्त्रांनी झाल्याचा अहवाल बंगलोरच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेने दिला आहे. त्यामुळे या तिन्ही पुरोगामी नेत्यांच्या हत्येमागे एकच सूत्र असल्याचे स्पष्ट झाल्याचे वृत्त बंगलोरहून प्रसिद्ध होणाऱ्या एका वृत्तपत्राने दिले आहे.कर्नाटकच्या वरिष्ठ पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या या वृत्तात कलबुर्गी व पानसरे यांच्यावर झाडण्यात आलेल्या गोळ््यांच्या घटनास्थळावरून मिळालेल्या रिकाम्या पुंगळ््या या एकसारख्याच असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे. याशिवाय या तिन्हीही हल्ल्यांची पद्धत एकसारखीच आहे तसेच पानसरे यांच्यावर झाडण्यात आलेल्या अन्य एका गोळीच्या पुंगळीचा दाभोलकर यांच्या हत्येच्या घटनास्थळावरून मिळालेल्या पुंगळीशी साधर्म्य तपासणीत स्पष्ट झाले आहे. त्यातून असाही संशय आहे की, हल्लेखोरांनी दोन वेगवेगळ््या शस्त्रांनी या तिन्हीही हत्या केल्या असाव्यात. याबाबत कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरन यांनीही अलीकडेच म्हैसूर येथे केलेले विधान या संशयाला पुष्टी देणारे आहे. ते म्हणाले होते, की या तिन्ही हत्यांबाबत आमच्याकडे ठोस माहिती मिळाली आहे व त्यामागे एकच सूत्र असल्याचे स्पष्ट झाले आहे.सनातन संस्था, रूद्र पाटील, समीर गायकवाड, गोवा बॉम्बस्फोट व प्रवीण लिमकर यांच्याकडे या तिन्ही हत्येप्रकरणी संशयाची सूई वळत असल्याने तपास यंत्रणेला यांच्यातील परस्पर संबंध जोडण्यासाठी ठोस पुरावे शोधत असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. यातूनच समीर गायकवाडचे कॉल डिटेल्स तपासण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)केंद्र सरकारने स्पष्टीकरण करावे : मेघा पानसरेदाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या हत्येमध्ये कोणतेही साम्य नाही, असे निवेदन नुकतेच केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजजू यांनी लोकसभेत केले त्याच्याशी आम्ही पानसरे व दाभोलकर कुटुंबीय पूर्ण असहमत आहोत. हे विधान त्यांनी कशाच्या आधारावर केले याची माहितीही त्यांनी दिली पाहिजे. आता या तिन्ही व्यक्तींच्या हत्येच्या ठिकाणी सापडलेल्या गोळांच्या पुंगळ््या सारख्याच असल्याचा अहवाल आला असल्याने राज्य सरकारने त्याबद्दल तातडीने स्पष्टीकरण करावे, अशी मागणी मेघा पानसरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.पत्रकात म्हटले आहे की,‘या तिन्ही हत्येच्या मागे उजव्या विचारांच्या सनातन संस्थेचाच सहभाग असल्याचा आम्हास दाट संशय आहे. पानसरे हत्येप्रकरणी संशयित म्हणून अटक केलेला समीर गायकवाड हा सनातन संस्थेचाच कार्यकर्ता आहे. त्याच्या अटकेनंतर सनातन संस्थेने पत्रकार परिषद घेऊन त्याला पाठिंबा दिला आहे. उच्च न्यायालयात आम्ही दाखल केलेल्या याचिकेतही संशयित म्हणून रूद्र पाटील याचाही सहभाग असल्याचे म्हटले आहे. त्याच्या पत्नीनेच गायकवाडचे वकीलपत्र घेतले आहे. दाभोलकर व पानसरे यांच्या हत्येसंदर्भातील न्यायालयातील याचिकाही उच्च न्यायालयाने एकत्रितच केल्या आहेत. आम्ही आता अशी मागणी करत आहोत की केंद्र सरकारने यासंबंधीचे स्पष्टीकरण करावे.’पानसरे कुटुंबीय संजयकुमार यांना भेटणारपानसरे हत्येप्रकरणाच्या तपासाची माहिती घेण्यासाठी ‘एसआयटी’चे प्रमुख संजयकुमार यांची पानसरे कुटुंबीय भेट घेणार आहेत. काल, गुरुवारी मेघा पानसरे व भाकपचे नेते दिलीप पवार यांनी तपास अधिकारी एस. चैतन्या यांची भेट घेतली व त्यांना ही माहिती दिली. संजयकुमार कोल्हापुरात आल्यावर तुम्हास कळविण्यात येईल, असे त्यांना सांगण्यात आले.न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल मी अजून पाहिलेला नाही परंतु या तिन्ही हत्यांमध्ये कोणतेही साम्य नाही. अधिक माहितीसाठी तुम्ही तपास अधिकारी एस. चैतन्या यांच्याशी बोलावे.- संजयकुमार, ‘एसआयटी’चे प्रमुखया तिन्ही हत्यांमध्ये संशयितांनी ७.६५ एमएमचे देशी बनावटीचे पिस्तुल वापरले आहे. दाभोलकर यांच्यावर चार गोळ््या झाडण्यात आल्या. पानसरे यांच्यावर दोन पिस्तुलांतून पाच गोळ््या झाडण्यात आल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी हत्या एकाच प्रकारच्या शस्त्रांनी
By admin | Published: December 12, 2015 12:49 AM