कोल्हापूर : डॉ. नरेंद्र दाभोलकर, अॅड. गोविंद पानसरे, साहित्यिक एम. एम. कलबुर्गी प्रामाणिकपणे आणि मुक्तपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग केल्याने बळी गेले, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी रविवारी व्यक्त केले. परिस्थिती गंभीर आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. आजरा येथील श्री रवळनाथ को-आॅपरेटिव्ह हौसिंग फायनान्स सोसायटीच्या कोल्हापूर शाखेच्या चौथ्या वर्धापनदिनप्रसंगी अमृतमहोत्सवानिमित्त पाटील व त्यांच्या पत्नी कमल यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ते बोलत होते. माजी कुलगुरू डॉ. बा. प. साबळे अध्यक्षस्थानी होते. लकी बझारच्या इंद्रप्रस्थ हॉलमध्ये कार्यक्रम झाला. संस्थापक अध्यक्ष म. ल. पाटील, डॉ. आनंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. पाटील म्हणाले, मोकळेपणाने आपली मते मांडणेही अवघड बनल्याने सध्याचे वातावरण भयावह बनले आहे; म्हणूनच समाजाची फेररचना करण्याची गरज ठळक आहे. अलीकडे विषमतेची दरी वाढवणारी व्यवस्था मजबूत होते आहे. सामान्यांच्या हितासाठी भाववाढीवर लक्ष केंद्रित केल्यानेच रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी पुन्हा नियुक्त होण्यास इच्छुक नाही, अशी अवस्था राष्ट्रीय अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांची सध्याच्या सरकारने केली. सामान्यांच्या खिशातील पैसे काढून घेत, व्याजदर कमी करीत भांडवलदारांचे हित जपले जात आहे. त्याला राजन विरोध करीत राहिले. परिणामी सप्टेंबरमध्ये त्यांना सरकार बाजूला करणार होते. त्याची कुणकुण लागल्यामुळेच त्यांनी पुन्हा गव्हर्नरपद नको, असे म्हटले आहे. ‘आरबीआय’चे धोरण ठरवण्याचा अधिकार तज्ज्ञांकडेच असावा. राजकीय हस्तक्षेप प्रमाणापेक्षा अधिक असू नये. डॉ. साबळे म्हणाले, येत्या महिन्याभरात देशात प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतचे नवे शैक्षणिक धोरण ठरविण्यात येईल. राज्यातील विद्यापीठ कायद्यातही दुरुस्ती होणार आहे. त्यावर डॉ. पाटील यांनी लिहीत राहावे. यावेळी संपादक श्रीराम पवार, एस. ई. कालेकर, प्रा. आनंद पाटील यांची भाषणे झाली. प्रा. आर. एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास व्ही. बी. पाटील, डॉ. वासंती रासम, कुलसचिव व्ही. एम. शिंदे, विश्वनाथ शिंदे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. डॉ. वर्षा मेंदगी यांनी आभार मानले. ‘ते’ कुलगुरू झाले नाहीत पात्र असूनही डॉ. जे. एफ. पाटील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू झाले नाहीत. ते कुलगुरू झाले असते तर प्रशासकीय कामकाजात अडकले असते. त्यांचा मानवी चेहरा हरवला असता. यामुळे नियतीला ते कुलगुरू व्हावेत असे वाटले नसावे, अशी टिप्पणी डॉ. साबळे यांनी केली.
दाभोलकर, पानसरे प्रामाणिक अभिव्यक्तीचे बळी
By admin | Published: June 20, 2016 12:43 AM