कोल्हापूर : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन संपूर्ण कोल्हापूर शहराला १ एप्रिलपासून एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय मंगळवारी सायंकाळी महानगरपालिकेत झालेल्या पदाधिकारी, अधिकारी बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी महापौर अश्विनी रामाणे होत्या. दरम्यान, पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन कोल्हापूरच्या जनतेने प्रशासनास सहकार्य करावे, आणि मिळणारे पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापौरांनी केले. राधानगरी व काळम्मावाडी धरणातील पाणीसाठा कमी होत असून मे व जून महिन्यात पाण्याची तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून एक दिवस आड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. आयुक्त पी. शिवशंकर यांनी मंगळवारी सायंकाळी सर्व पदाधिकारी आणि प्रमुख नगरसेवकांशी चर्चा करून १ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी करण्याचे ठरले. कोणत्या भागात, कोणत्या दिवशी पाणीपुरवठा होणार आहे, याचे नियोजन तयार करून सर्व नगरसेवकांना माहिती द्यावी, ज्या दिवशी पाणीपुरवठा होणार नाही त्याच दिवशी त्या भागातील पाण्याची गळती काढण्याचे काम हाती घेण्यात यावे, एक दिवस आड पाणीपुरवठा करत असताना सर्व प्रभागांत पाण्याच्या टँकर्सची व्यवस्था करण्यात यावी, असे आवाहन यावेळी बैठकीत नगरसेवकांनी केले. बैठकीत नगरसेवकांनी शहरातील गळतीकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. शिंगणापूर योजनेवरील जलवाहिनीला चिव्यांचा बाजार, खत्री लॉन, हॉकी स्टेडियम, सायबर चौक, गंगाई लॉन, फुलेवाडी, आदी ठिकाणी मोठी गळती सुरू असून ती दूर करण्याचा प्रशासनाने प्राधान्याने प्रयत्न करावा, अशी सूचना या बैठकीत करण्यात आली. पुढील तीन महिन्यांसाठी शक्य झाल्यास खासगी कूपनलिका ताब्यात घेऊन त्याचे पाणी जनतेला उपलब्ध करून द्यावे, सार्वजनिक कूपनलिकांवर मोटार बसविण्यात याव्यात, अशा महत्त्वाच्या सूचनाही पुढे आल्या. सध्या मनपाकडे नऊ पाण्याचे टँकर असून त्यामुळे त्याच्या वाटपाचे नियोजन चुकते. त्यामुळे किमान तीस टँकर उपलब्ध करून दिले जावेत, असेही यावेळी सांगण्यात आले. बैठकीस महापौर रामाणे, आयुक्त शिवशंकर, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, महिला बालकल्याण सभापती वृषाली कदम, विरोधी पक्षनेते संभाजी जाधव, गटनेता शारंगधर देशमुख, सुनील पाटील, नगरसेवक संदीप नेजदार, मेहजबीन सुभेदार, नीलोफर आजरेकर, प्रतिज्ञा निल्ले, मनीषा कुंभार, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, उपअभियंता प्रभाकर गायकवाड, रावसाहेब जाधव, शाखा अभियंता भास्कर कुंभार, व्यंकट सुरवसे, हेमंत मोंगाणे उपस्थित होते. पाणी जपून वापरासध्या पाण्याची टंचाई जाणवत असल्यामुळे भविष्याचा विचार करुन एक दिवस आड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मिळणारे पाणी जपून वापरावे. त्याचा अपव्यय टाळावा, नळाला येणारे पाणी शक्यतो पिण्यासाठीच वापरावे. वाहने धुण्याचे प्रकार टाळावेत.अश्विनी रामाणे, महापौरउपनगरांत धावाधावटँकरने पाणीपुरवठा : साळोखेनगर, जरगनगर, रिंगरोडवर टंचाई कोल्हापूर : मार्च महिन्यातच शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सद्य:स्थितीत शहराच्या मध्यवस्तीत पाणीपुरवठा सुरळीत सुरू असला तरी उपनगरांत मात्र पाण्याचा ठणठणाट आहे. गेल्यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर सध्याच्या परिस्थितीत होत आहे. एकेकाळी संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करणारा कळंबा तलाव पूर्णपणे आटला आहे. तर धरणातील पाणीसाठाही कमी झाल्याने पंचगंगा नदीमार्गे शिंगणापूर बंधाऱ्यापर्यंत वारंवार पाणी सोडण्यास पाटबंधारे विभागाने नकार दिला आहे. त्यामुळे शिंगणापूर बंधाऱ्यानजीक वारंवार पाण्याची पातळी खालावत आहे. त्यामुळे तेथून उपसा करणाऱ्या यंत्रणेवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात शहराच्या निम्म्या भागाचा पाणीपुरवठा खंडित झाला होता; पण सद्य:स्थितीत शहरात पाणीपुरवठा सुरू असला तरी उपनगरांत मात्र पाण्यासाठी नागरिकांना धावाधाव करावी लागत आहे. शहराच्या साळोखेनगर, जरगनगर, फुलेवाडी रिंगरोडसह ई वॉर्डातील काही भागांत पाण्यासाठी नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. फुलेवाडी रिंगरोडवरील नव्याने झालेल्या अनेक कॉलन्यांमध्ये दोन दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. सर्वांत मोठ्या गजानन कॉलनीत तर गेल्या पाच दिवसांपासून नळाला पाणीच न आल्याने तेथील नागरिक हवालदिल झाले आहेत. हा भाग दोन नगरसेवकांच्या प्रभागाच्या हद्दीवर येत असल्याने दोन्हीही नगरसेवकांनी या भागाकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार नागरिकांतून केली जात आहे.
१ एप्रिलपासून दिवसाआड पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2016 12:38 AM