कोल्हापूर : शिंगणापूर जल उपसा केंद्रातील विद्युत ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने गेले चार दिवस संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. हा ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती करण्यासाठी लागणारा कालावधी विचारात घेता उद्या, शनिवारी पहाटेपासून आठवडाभर संपूर्ण शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यावर शिक्कामोर्तब केले.
महापौर शोभा बोंद्रे यांच्या दालनात गुरुवारी सायंकाळी पाण्याचे नियोजन करण्यास पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची बैठक होऊन निर्णय घेण्यात आला. दरम्यान, शहरवासियांनी काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन महापौर बोंद्रे यांनी केले आहे.कोल्हापूर शहरातील ए, बी व ई वॉर्ड तसेच संलग्नित उपनगरे व ग्रामीण भागातील नागरिक यांना होणारा दैनंदिन पाणीपुरवठा पुढील सात दिवसांकरिता दिवसाआड होणार आहे. ट्रान्सफॉर्मर दुरुस्त झाल्यानंतरच एकूण चार पंप सुरू करणे व पूर्णक्षमतेने पाणी उपसा करणे शक्य होणार आहे.
गटनेते शारंगधर देशमुख म्हणाले, प्रशासनास नेहमी सर्व सदस्यांचे सहकार्य राहील; मात्र प्रशासनानेही सदस्यांना सहकार्य केले पाहिजे. दिवसाआड या कालावधीत भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय होण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेकडील उपलब्ध टँकरद्वारे पाणी वाटपाचे नियोजन केले आहे. गटनेते विजय सूर्यवंशी म्हणाले, या कालावधीत टँकरचे योग्य नियोजन ठेवा, परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत अधिकाऱ्यांनी सदस्यांशी समन्वय राखावा.यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती सुरेखा शहा, गटनेते शारंगधर देशमुख, सुनील पाटील, विजय सूर्यवंशी, नगरसेविका वनिता देठे, माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, जल अभियंता सुरेश कुलकर्णी, उपजल अभियंता व्ही. एन. सुरवशे, शाखा अभियंता राजेंद्र हुजरे, आदी उपस्थित होते.
ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी आठवडा लागणारशिंगणापूर जल उपसा केंद्राकडील एक ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने शिंगणापूर ते आपटेनगर पंपिंग स्टेशनपर्यंत पाणीपुरवठा करणाऱ्या एकूण ४ जलउपसा पंपांपैकी एका वेळेस फक्त एकूण ३ पंप चालू ठेवणे शक्य आहे. हे ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. हा ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करण्यासाठी आठवडा लागणार आहे.
‘बावडा फिल्टरहाऊस’ला नियोजनातून वगळलेकसबा बावडा फिल्टरहाऊस येथील उपसापंप सुरू असल्याने पाणीपुरवठा नियोजनातून कसबा बावडा फिल्टर हाऊसवरून होणारा पाणीपुरवठा वगळण्यात आल्याचे जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनी सांगितले.