विश्र्वास पाटीलकोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील (जि. कोल्हापूर) दूध संस्थेची नोंदणी रद्द करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्याने मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहनिबंधक (दुग्ध) बी. एल. जाधव (वय ५७, रा. सध्या मुंबई, मूळ सिडको, औरंगाबाद) यांना मंगळवारी अटक केली. लाचलुचपत विभागाच्या अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली.
मुंबईतील वरळी येथील दुग्ध विकास विभागाच्या आयुक्तांच्याच कार्यालयात त्यांना कारवाईची पूर्वकल्पना देऊन ही कारवाई करण्यात आली. जाधव हे वर्ग एक श्रेणीचे अधिकारी असून, वर्षानंतर निवृत्त होणार आहेत. त्यांच्या मुंबई व औरंगाबाद येथील घरांची झडती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.पोलिसांनी सांगितले, लोटेवाडी (ता. भुदरगड) येथील जय शिवराय दूध संस्थेची नोंदणी रद्द करण्याची मागणी त्याच गावातील हिंदुस्थान सहकारी दुग्ध व्यावसायिक संस्थेने केली होती. या गावात पाच दूध संस्था आहेत. इतर संस्थांनी ना हरकत दाखले दिले; परंतु हिंदुस्थान संस्थेने जय शिवरायच्या संस्थानोंदणीस पुण्यातील विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांच्याकडे हरकत घेतली. त्यांनी अपिल फेटाळून लावून नोंदणी कायम ठेवली.
या निर्णयाविरोधात फिर्यादीने सहनिबंधक (दुग्ध) जाधव यांच्या कार्यालयाकडे अपील केले. त्याची ३ ऑक्टोबर २०१९ ला सुनावणी झाली व प्रकरण निवाडा देण्यासाठी बंद करण्यात आले. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांची कार्यालयात भेट घेतल्यावर त्यांनी ४० हजार लाचेची मागणी केली व निकाल तुमच्यासारखा देतो असे सांगितले. त्यानंतर संस्थेच्या अध्यक्षांसह कोल्हापूरचे माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रकांत खोंद्रे यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.
त्यानुसार १६ ऑक्टोबर २०१९ ला लाच मागणी पडताळणी केली असता त्यांनी २५ हजार रुपये मागितल्याचे सरकारी पंचांसमक्ष स्पष्ट झाले. परंतु त्यानंतर त्यांना कारवाईची कुणकुण लागल्याने पैसेच स्वीकारले नाहीत. परंतु अपिलाचा निर्णय दिला. त्यामध्ये कोल्हापूरचे तत्कालीन साहाय्यक निबंधक अरुण चौगले यांची चौकशी करून अहवाल पाठवावा, जय शिवराय संस्थेची नोंदणी कायम ठेवत हिंदुस्थानी संस्थेला योग्य त्या प्राधिकारणाकडे दाद मागण्याचे निर्देश दिले. त्यानंतर कोरोनामुळे अन्य काही कारणाने हे प्रकरण प्रलंबित राहिले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर आयुक्त गौतम लखमी यांनी या प्रकरणात लक्ष घालून नव्याने तपास करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक अमोल शिंदे यांना दिले. त्यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याने सोमवारी (दि. २१) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ कलम ७ अन्वये रीतसर गुन्हा (गुन्हा नंबर २५-२०२०) दाखल केला.