राधानगरी : महाराष्ट्रातील सर्वात जुने व गव्यांसाठी प्रसिद्ध असणारे दाजीपूर अभयारण्य जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांच्या कालावधीत पर्यटनासाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.नोव्हेंबर ते मे पर्यंत पर्यटनासाठी दाजीपूर अभयारण्य खुले असते. जूनपासून सुरू होणाऱ्या मुसळधार पावसामुळे अभयारण्य प्रवेश निषिद्ध केला जातो. दिवाळी दरम्यान एक नोव्हेंबरपासून पर्यटनासाठी अभयारण्य प्रवेश पुन्हा खुला केला जाईल. पर्यटकांसाठी दाजीपूर प्रवेश बंद केला असला तरी पावसाळी पर्यटनासाठी राऊतवाडी धबधबा, राधानगरी धरण पर्यटकांना खुणावत आहे.येथील दोन्ही जलाशये, बॅक वॉटर, अभयारण्य, धबधबे, जंगल, आदींनी हा परिसर नटलेला आहे. त्याचबरोबर पर्यटन व रोजगार उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने विविध सोयी-सुविधा निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. एमएसआरडीसीकडून या भागाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास साधण्यासाठी प्रारूप विकास आराखडा तयार करण्याच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे.
Kolhapur: दाजीपूर अभयारण्य पर्यटकांसाठी पाच महिने बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 5:58 PM